सह्याद्री न्यूज नेटवर्क |
औरंगाबाद, (ता.४) : पैठणमधील प्रभाग क्रमांक दहा व अकरामधील नागरिकांची पाणी समस्या लवकरच दूर करणार असल्याचे रोहयोमंत्री संदिपान भूमरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आज सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पैठणमधील पाणी प्रश्नांबाबतच्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अजय सिंग, विलासबापू भुमरे, पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, नंदूअण्णा काळे, पैठण नगर परिषदेचे गटनेते तुषार पाटील, भूषण कावसानकर, जालिंदर अडसूळ, अजीम कट्यारे, सादेखभाई धांडे, अनिल चपडे व वसीम शेख आदी उपस्थित होते.
पैठण शहरातील प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग क्रमांक 11 मधील पाण्याची समस्या लक्षात घेता याठिकाणी जलकुंभ असण्याबाबतचा विचार श्री. भूमरे यांनी मांडला. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी या जलकुंभास तत्काळ मंजुरी देऊन काम सुरू करण्याचे संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर नवनाथ महाराज मंदिर जलकुंभाचे उद्घाटन श्री. भूमरे व जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे श्री. भूमरे यावेळी म्हणाले.
नगरोत्थान योजनेमधून जायकवाडीतील पाणीपुरवठा केंद्र, फिल्टर प्लांट दुरुस्तीसाठी लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल. वॉटर ग्रीड योजनेत पैठण शहराचा विचार करावा. त्यासंबंधी आराखडा तयार करावा, अशा सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना श्री. भूमरे यांनी दिले. या वॉटरग्रीड योजनेमुळे पैठणमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले. पैठण शहरातील प्रभाग क्रमांक दहा व अकरामधील नागरिकांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित करून मार्गी लावल्याबद्दल श्री. भूमरे यांचे आभार मानले.
पैठणमधील पाणी समस्यांसंदर्भात रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी घेतली आढावा बैठक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 05, 2021
Rating:
