सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.६) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'ब्रेक द चैन' या नवीन नियमावली अंतर्गत ५ एप्रिल पासून लॉकडाऊन करण्यात आल्याने कित्येक दिवस तालुक्यातील बियरबार व दारूची दुकाने बंद राहिली. नंतर दारूचा काळा बाजार फोफावला. काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा दरात दारू विकली जाऊ लागल्याने ती खरेदी करणं मद्य शौकींनांच्या आवाक्या बाहेर गेल्याने त्यांनी पर्याय म्हणून सॅनिटायजरचं सेवन करणं सुरु केलं. सॅनिटायजरच्या अती सेवनाने ८ ते १० जणांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे प्रशासनाने बियरबार व दारू दुकानांना होम डिलेव्हरी करण्याच्या अटीवर दारू विकण्याची परवानगी दिली. पण बियरबार व दारू दुकानदारांनी आस्थापनांच्या काही अंतरावरच ग्राहकांना दारू देण्याचा सपाटा सुरु केला. आता तर सरळ कॉउंटर वरूनच दारू दिली जात आहे. परंतु दारू अजूनही वेळेच्या बंधनात अडकली असल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे सुगीचे दिवस सुरूच आहेत. तळीरामांची रात्रीची दारूची तलब भागविण्यात अवैध दारू विक्रेत्यांची मोठी भूमिका असते. गल्ली बोळात अवैध दारू विक्रेते तळीरामांच्या सेवेत सज्ज असतात. तळीरामांच्या एका फोनवर अवैध दारू विक्रेते हवी तेथे दारू उपलब्ध करून देत असल्याने बियरबार व दारू दुकाने बंद असण्याचा त्यांना फारसा फरक जाणवतांना दिसत नाही. दारू दुकानदार व बियरबार मालक अवैध दारू विक्रेत्यांना मुबलक दारूचा साठा पुरवून आपला कोटा पूर्ण करून घेत आहेत. अवैध दारू विक्रेते बंदी दरम्यान जास्त किमतीत तर दुकाने खुली असतांना बियरबारच्या दरात दारू विकतात. त्यामुळे तळीरामही आता अवैध दारू विक्रेत्यांकडून दारू खरेदी करून मळेल त्या खुल्या जागेत, झाडाच्या सावलीत, बंद दुकानाच्या पायऱ्यांवर, पान टपऱ्यांच्या मागे, चिवड्याचा दुकानांमध्ये, बिसलेरी, डिस्पोजल व चकणा मिळणाऱ्या दुकानांच्या बाजूला, नागरिकांच्या घरासमोरील खुल्या जागेत बिनधास्तपणे दारू धोकास्तांना दिसतात. सायंकाळच्या वेळेला बाजार समितीच्या पटांगणात दारू पिणारे गुथ्याने बसलेले असतात. त्यामुळे सायंकाळी टेहाळणीला जाणाऱ्या महिला पुरुषांना नाईलाजास्तव बाजार समितीच्या रस्त्यानी फेरफटका मारणे बंद करावे लागले आहे. शेतकऱ्यांचा माल विक्रीकरिता येत असल्याने बाजार समितीचे दोनही गेट खुले राहत असल्याने दारुड्यांना रान मोकळे झाले आहे. एवढेच नाही तर टोल नाका वाचविण्याकरिता कोळशाचे ट्रकही बाजार समितीतून मार्ग काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव ट्रक बाजार समितीतून काढले जात असल्याने बाजार समिती पटांगणात फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. गेटवर राहणारे कर्मचारी ना दारू पिणाऱ्यांना टोकतात, ना अन्य मालवाहू ट्रकांना अडवितात.
शहरातील खुली पटांगणे, खुल्या जागा, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे, भर वस्तीतील खुल्या जागा, बंद दुकाना मागे दारू ढोकसणाऱ्यांचे गुत्थे सजलेले असतात. दारूच्या नशेत जोरजोरात आवाज करणे, अश्लील शब्दांचा प्रयोग करणे, यामुळे मार्गक्रमण करणारे नागरिक व वस्त्यांमध्ये राहणारे नागरिक कमालीचे वैतागले आहेत. वस्त्यांमधील खुल्या जागेवरून दारू पिणाऱ्यांचे गुत्थे उठे पर्यंत परिसरातील नागरिकांना दरवाजे बंद करून स्वतःला घरांमध्ये कोंडून घ्यावे लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे दारू ढोकसणाऱ्यांच्या मैफिली सजत असल्याने शहरातील नागरिकांचं रस्त्यांनी फेरफटका मरण कठीण झालं आहे. रस्त्या लगतच्या बंद दुकानांसमोर दारू पिणाऱ्यांचे घोळके बसत असल्याने महिलांनी रस्त्याने फेफटका मारणे बंद केले आहे. दारुड्यांना ना जनाची, ना मनाची लाज उरली असून त्यांच्यामुळे आता नागरिकांनाच नाजिरवण्यासारखं वाटू लागलं आहे. या सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
चल दोस्ता दारू घेऊ, रस्त्याच्या कडेलाच बसून पिऊ, कोण काय म्हणते पाहून घेऊ !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 06, 2021
Rating:
