रोजगार देता का हो रोजगार, सुशिक्षित बेरोजगार फोडत आहेत टाहो !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१४) : मागील दिड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरु आहे. याकाळात कित्येकांचे रोजगार बुडाले नोकऱ्या हिरवाल्या. महानगरांमध्ये खाजगी क्षेत्रात नोकऱ्या करणारे गावी परतले. त्यातील काही जण शेतीत हातभार लावत आहेत. तर काही शेतमजूर म्हणून कामाला जात आहे. काहींना अद्यापही रोजगार मिळालेला नसून ते गावातच निराश जीवन जगत आहे. मिळेल ते काम करण्याची तयारी असतांनाही गाव शहरात काम मिळत नसल्याने बेरोजगारवर्ग नैराशेच्या गर्तेत आला आहे. शेती हा बेभरवशाचा व्यवसाय असल्याने संपूर्ण कुटुंबाचा उदर्निवाह शेतीवर होणं शक्य नसल्याने शेतकरी कुटुंबातील मुलंही रोजगाराच्या शोधात फिरतांना दिसत आहे. खाजगी शाळा महाविद्यालये बंद असल्याने कित्येक खाजगी शिक्षक बेरोजगार झाले आहेत. स्कुल बस चालकांवर बेरोजगारीची समस्या ओढवली आहे. खाजगी क्षेत्राशी जुळलेला बहुतांश नोकरदारवर्ग बेरोजगारीचा मार झेलत आहे. कोरोना व लॉकडाऊनचा भरवसा नसल्याने युवकांनी महानगरांकडे जाणे टाळले आहे. पण गावातच राहून रोजगार मिळविण्याच्या त्यांच्या मानसिकतेवर आघात होतांना दिसत आहे. तालुका या बेरोजगारांना रोजगार देण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. खनिज संपत्तींनी नटलेल्या तालुक्यात रोजगाराअभावी कित्येकांना गरिबी व लाचारीचं जीवन जगावं लागत आहे, यापेक्षा मोठी शोकांतिका आणखी कोणती असू शकते. निवडणूक काळात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आणणारे नंतर बेरोजगारीवर भाष्यच करतांना दिसत नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी तालुक्यात रोजगाराच्या वाटा उपलब्ध करून देण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. उदर्निवाहाच्या संकटामुळे कित्येक युवक मार्ग भटकतांना दिसत आहे. स्वाभिमानानं जगण्याची वाट मिळत नसल्याने बेरोजगारांची पावलं अराजक्तेकडे वळत आहे. नंतर याच बेरोजगार युवकांचा धनदांडगे व राजनीतिक मंडळी आपल्या स्वार्थाकरिता वापर करून घेतांना दिसतात. पोटाची खळगी भरण्याकरिता ते कुणाशीही सलगी करण्यास तयार होतात. बेरोजगारीच्या जगण्यामुळे सुशिक्षितांचं वागणं बदलतं व त्यांच्यातूनच नंतर अनिष्ठ प्रवृत्ती उदयास येते. तालुक्यात बेरोजगारीचा विळखा वाढत असून बेरोजगारीची समस्या अधिकच गडद होऊ लागली आहे. लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास बेरोजगारीची समस्या उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता रोजगाराच्या वाटा निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रोजगार देता का हो रोजगार, सुशिक्षित बेरोजगार फोडत आहेत टाहो ! रोजगार देता का हो रोजगार, सुशिक्षित बेरोजगार फोडत आहेत टाहो ! Reviewed by सह्याद्री चौफेर on June 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.