अनाधिकृत गोडाऊनमध्ये अवैधरित्या खतांचा साठा केल्या प्रकरणी दोन साठेबाजांवर गुन्हा दाखल

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१४) : खतांचा साठा करून नंतर तो चढ्या किमतीने विकण्याचा गोरखधंदा काही व्यावसायिकांनी चालविला आहे. खताचा तुटवडा निर्माण करून कास्तकारांना वेठीस आणलं जातं. शेत पिकांना खते देण्याची वेळ येऊनही खतांची टंचाई निर्माण करून कास्तकारांना खते दिल्या जात नाही. नंतर अवैधरित्या साठवून ठेवलेली खते दामदुपटीने कास्तकारांना विकली जातात. गरजेपोटी नाईलाजास्तव त्यांना जास्तीची किंमत मोजून खते घ्यावीही लागतात. नाही तर पिकवाढ खुंटून मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी गठीत केलेले विशेष पोलिस पथक अवैधधंदे करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेऊन आहे.

अवैधधंद्यांबाबत माहिती मिळाल्यास आरोपींवर धडक कार्यवाही करण्याची मोहीम विशेष पोलिस पथकानं हाती घेतली आहे. अवैधधंद्यांशी जुळलेल्या कुठल्याही व्यक्तीची गय केली जाणार नसल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. त्यानुसार वणी उपविभागात अवैधधंद्यांवर बेधडक कार्यवाही करण्याकरिता विशेष पोलिस पथक तयार करण्यात आले. या पथकाने काल १३ जूनला दुपारी ३ वाजता पाटण (बोरी) पिंपळखुटी मार्गावरील अनाधिकृत गोडाऊनमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेला १५ लाख रुपये किमतीचा खतांचा साठा उघडकीस आणला. पांढरकवडा कृषी अधिकारी यांना या खत साठ्याची माहिती देऊन त्यांच्या समक्ष पडताळणी केली असता अवैधरित्या खतांचा साठा करून ठेवल्याचे लक्षात आले. कृषी अधिकाऱ्यांनी गोडाऊन सिल करून गॊडाऊन मालकासह अन्य एका साठेबाजावर पुढील कार्यवाही करण्याकरिता पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.  
यवतमाळ विशेष पोलिस पथकाला पाटण (बोरी) पिंपळखुटी मार्गावरील आनंद चोपडा यांच्या अनधिकृत गोडाऊनमध्ये अवैधरित्या खतांचा साठा करून ठेवला असल्याची गुप्त माहिती मिळाली. विशेष पोलिस पथकाने पांढरकवडा कृषी अधिकारी आर.आर. दासारवार यांना या अवैध खत साठ्याबाबत माहिती देऊन त्यांना घटनास्थळी पाचारण केले. पोलिस पथकाने कृषी अधिकाऱ्यांसमक्ष गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला खतांचा साठा तपासाला असता तो अवैध असल्याचे आढळून आले. आनंद चोपडा यांच्याकडे खतांचा साठा करण्याचा कोणताही परवाना नसतांना किंवा त्यांना साठा करण्याची अधिकृत मान्यता मिळाली नसतांना त्यांनी आपल्या अनाधिकृत गोडाऊनमध्ये अवैधरित्या खतांचा साठा केल्याचे निदर्शनास आले. एकंदरीत १५ लाख ११ हजार ९५ रुपये किमतीचा खतांचा साठा त्यांनी करून ठेवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. विशेष पोलिस पथकाने पांढरकवडा कृषी अधिकारी आर.आर. दासरवार यांच्याकडे पुढील कार्यवाही करिता प्रकरण वर्ग केले. तालुका कृषी अधिकारी आर. आर. दासरवार यांनी आनंद चोपडा यांचे गोडाऊन सील करून त्यांच्यावर पुढील कार्यवाही करण्याकरिता पांढरकवडा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी आनंद चांदमलचोपडा व गजानन गंगाराम भूपतवार या दोन्ही साठेबाजांवर गुन्हा दाखल केला आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलिस पथक प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे, विशेष पोलिस पथकातील राजू बागेश्वर, जितेश पानघाटे, मुकेश करपते, मिथुन राऊत, निलेश, अजय, शासकीय वाहन चालक अजय महाजन तथा कृषी अधिकारी दासरवार, चव्हाण यांनी केली.
अनाधिकृत गोडाऊनमध्ये अवैधरित्या खतांचा साठा केल्या प्रकरणी दोन साठेबाजांवर गुन्हा दाखल अनाधिकृत गोडाऊनमध्ये अवैधरित्या खतांचा साठा केल्या प्रकरणी दोन साठेबाजांवर गुन्हा दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on June 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.