विनर्स बियरबार मधील दारू चोरी प्रकरणाचा डीबी पथकाने अतिशीघ्र लावला छडा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१४) : शहरातील गोकुळनगर परिसरातील विनर्स बियरबार मधून हजारो रुपये किमतीची विदेशी दारू चोरीला गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला करण्यात आली.
अज्ञात चोरटयांनी बारच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला, व हजारो रुपये किमतीची दारू लंपास केली. बियरबार सुरु करण्याच्या उद्देशाने १० जूनला या बियरबारमध्ये दारूचा साठा उतरविण्यात आला होता. बियरबारवर नजर ठेऊन असलेल्या चोरटयांनी १० ते १२ जून दरम्यान बियरबारमध्ये चोरी केल्याची तक्रार १३ जूनला बार मालकाने पोलिस स्टेशनला नोंदविली. तक्रार प्राप्त होताच डीबी पथकाने तपासचक्रे फिरवून शीघ्र या चोरी प्रकरणाचा छडा लावून दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. 

गोकुळनगर परिसरातील विनर्स बियरबार अभिजित अरुणराव सातोकर (३६) रा. देशमुखवाडी यांनी नुकतेच खरेदी केले. बियरबार सुरु करण्याच्या उद्देशाने त्यांनी लाखो रुपयांचा दारू साठा मागविला. १० जूनला बियरबारमध्ये दारूसाठा उतरविण्यात आला. बियरबारवर पाळत ठेऊन असलेल्या चोरटयांनी संधीचा फायदा घेत बारच्या खिडकीचे ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश करत हजारो रुपये किमतीच्या दारूवर डल्ला मारला. १३ जूनला बार मालक अभिजित सातोकर बियरबार ओपनिंगची तयारी करण्याकरिता गेले असता त्यांना बारच्या खिडकीचे ग्रील तुटलेले दिसले. त्यांनी आतमध्ये जाऊन बघितले असता हजारो रुपयांची दारू चोरीला गेल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ पोलिस स्टेशन गाठून अज्ञात चोरटयांनी बारमध्ये चोरी करून हजारो रुपये किमतीची दारू चोरून नेल्याची तक्रार नोंदविली. तक्रार दाखल होताच तपास डीबी पथकाकडे देण्यात आला. डीबी पथकाने तपासचक्रे फिरवीत अतिशीघ्र या चोरी प्रकरणाचा छडा लावला.

 त्याच परिसरातील दोन जणांनी बियाबारमध्ये चोरी केल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. तसेच या चोरट्यांनी चोरीचा माल राजू मोरे याच्या शेतात असलेल्या बंड्यातील कुटारात लपवून ठेवला असून ते दोघेही तेथेच असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिस राजू मोरे यांच्या शेतात गेले असता, आरोपी त्याच ठिकाणी लपून बसल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांना चोरीच्या मालाबाबत विचारले असता, त्यांनी माल बंड्यातील कुटारात लपवून ठेवला असल्याचे सांगितले. पोलिसांनी रामेश्वर उर्फ रामा मनोहर साळुंके (३२) व राजू नारायण मोरे (३४) दोघेही रा. गोकुलनगर यांना अटक करून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या कडून वेगवेगळ्या कंपनीची ६५ हजार ८०५ रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. 

सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, हरिन्द्र भारती, पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार, चालक प्रफुल नाईक यांनी केली.
विनर्स बियरबार मधील दारू चोरी प्रकरणाचा डीबी पथकाने अतिशीघ्र लावला छडा विनर्स बियरबार मधील दारू चोरी प्रकरणाचा डीबी पथकाने अतिशीघ्र लावला छडा Reviewed by सह्याद्री चौफेर on June 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.