हातात तलवार घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

                        (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.९) : तालुका अनलॉक होताच गुण्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे. लॉकडाऊन काळात वेळेची व नियमांची बंधनं घालून देण्यात आल्यानं गुन्हेगारी प्रवृत्तीलाही आळा बसला होता. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे याकरिता शहरात पोलिसांची वेळोवेळी गस्त होत असल्याने भाईगिरी अंगात आणणारे बिळात लपले होते. पण आता निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आल्याने भाईगिरीचा आव आणणाऱ्यांनी शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे सुरु केले आहे. अशाच एका हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. 
वणी शहरातील जैताई नगर परिसरात गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे सुरु केले आहे. याच परिसरातील एका घरमालकाला तिघाजणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आज आणखी एक भाईगिरीचे प्रकारण समोर आले आहे. जैताई नगर परिसरात राहणारा एक युवक हातात तलवार घेऊन परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ जैताई नगर येथे जाऊन भाईगिरी अंगात दाटलेल्या या युवकाला ताब्यात घेतले. आज ९ जूनला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास जैताई नगर येथे ही घटना उघडकीस आली. सुरज नागेश बडगु (३०) रा. जैताई नगर असे या परिसरात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर कलम ४,२५ आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास जमादार विठ्ठल बुर्रेवार करीत आहे. 


हातात तलवार घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या हातात तलवार घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या Reviewed by सह्याद्री चौफेर on June 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.