गुटखा व तंबाखाचा अनाधिकृत साठा करणाऱ्या दोन आरोपींना अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२४) : प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याचा अनाधिकृत साठा करून तो दामदुपटीने काळ्या बाजारात विकण्याचा गोरखधंदा काही व्यवसायिकांनी चालविला आहे. तलब भागविणाऱ्या या वस्तूंच्या विक्रीतून अमाप पैसा मिळत असल्याने चांगले चांगले या धंद्यात उतरले आहेत. झटपट मालदार बनण्याच्या लालसेपायी अवैध धंदे करणारे कोणतीही जोखीम पत्करायला तयार होतात. अशाच एका गोदामात सुगंधित तंबाखू व गुटख्याचा अनाधिकृत साठा करून तो काळ्या बाजारात विकणाऱ्या दोन आरोपींना विशेष पोलिस पथकाने अटक केली आहे.

 पांढरकवडा पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या करंजी येथील एका गोदामावर विशेष पोलिस पथकाने आज २३ जूनला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास धाड टाकली. गोदामात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी २ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेतले. 
पांढरकवडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करंजी गावातील एका गोदामात सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची गुप्त माहिती विशेष पोलिस पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोदामावर धाड टाकली असता त्याठिकाणी सुगंधित तंबाखू व गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी सुगंधित तंबाखू व गुटख्याचा अनाधिकृत साठा करणाऱ्या विनोद परमेश्वर वनकर (४५) रा. करंजी व अमोल गोळे (३५) रा. करंजी, पांढरकवडा या दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या घराचीही झडती घेतली. त्यांच्या घरातही गुटखा व सुगंधित तंबाखाचा साठा आढळून आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या घर व गोदामातून तब्बल २ लाख १७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष पोलिस पथकाची मादक पदार्थांच्या साठ्यावरची ही दुसरी मोठी कार्यवाही आहे.

काही दिवसांआधी खैरी (वडकी) येथील अशाच एका गोदामावर धाड टाकून अनाधिकृतपणे साठवून ठेवलेला ८ लाख ५१ हजारांचा गुटखा व तंबाखू पोलिसांनी जप्त केला होता. मादक पदार्थांच्या विक्रीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने अनेकांनी या अवैध धंद्यात उडी घेतली आहे. परंतु वणी उपविभागातील अवैध धंद्यांवर वॉच ठेवण्याकरिता गठीत करण्यात आलेले विशेष पोलीस पथक अवैध धंदे करणाऱ्यांचा आता कर्दनकाळ ठरू लागले आहे. विशेष पोलिस पथकाने आता पर्यंत कित्येक दारू तस्कर, वाळू माफिया व साठेबाजांवर धडक कार्यवाही करून जिल्हा पोलिस अधीक्षकांची निवड सार्थकी ठरवली आहे. आजच्या या गोदामावरिल धाडीत पोलिस पथकाने जप्त केलेला मुद्देमाल व दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाही करिता पांढरकवडा पोलिसांच्या सुपूर्द केले. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलिस पथक प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे, विशेष पोलिस पथकाचे राजू बागेश्वर, जितेश पानघाटे, मिथुन राऊत, निलेश भुसे, अजय विभिटकर, वाहन चालक अजय महाजन यांनी केली.
गुटखा व तंबाखाचा अनाधिकृत साठा करणाऱ्या दोन आरोपींना अटक गुटखा व तंबाखाचा अनाधिकृत साठा करणाऱ्या दोन आरोपींना अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on June 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.