प्रलंबित मागण्यांना घेऊन आशा सेविकांनी केले धरणे आंदोलन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२३) : कोरोना काळात जोखीम पत्कारून रुग्णांना सेवा देणाऱ्या तसेच शहरातील प्रत्येक वार्ड पिंजून काढत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोना चाचण्या करण्यास प्रोत्साहित करून कोरोनाचे निवारण करण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या आशा सेविकांना आजही तुटपुंजे मानधन मिळत असून त्यांना अजूनही आरोग्य विभागात कायम करण्यात आलेले नाही. आशा सेविकांचे वेतनवाढ व कायम स्वरूपी समावेशाकरिता मागील आठ दिवसांपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु असून काल २२ जूनला तालुक्यातील आशा सेविकांनी "सिटू" संघटनेच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी सरकार कडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तीव्र निदर्शने देण्यात आली. 
आशा सेविकांनी कोरोना काळात स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता कोरोना रुग्णांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले. शहरातील प्रत्येक वार्ड पिंजून काढत पॉझिटिव्ह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले. ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनिंग करून नागरिकांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी केली. नागरिकांना कोरोना चाचण्या करण्यास प्रोत्साहित केले. कधी अफवांना बळी पडणाऱ्या नागरिकांच्या रोषाचाही सामना त्यांनी केला. पण त्यांना ना योग्य प्रोत्सानपर भत्ता मिळाला, ना वेतनवाढ, ना त्यांना कायस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आले. कित्येक वर्षांपासून त्यांचा प्रलंबित मागण्यांकरिता संघर्ष सुरु आहे. आता या आशा सेविकांनी काम बंद करून शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु केले आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून काल तालुक्यातील आशा सेविकांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. "सिटू" संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनाला किसान सभा व माकपने पाठिंबा दर्शविला. यावेळी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात गटप्रवर्तक यांना दरमहा २२ हजार तर आशा सेविकांना १८ हजार रुपये वेतन देण्यात यावे, ५०० ररुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, आशा सेविका व गटप्रवर्तकांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी, गटप्रवर्तकांना किपिंगचे ३००० रुपये देण्यात यावे, आशा सेविकांना आरोग्यवर्धिनीचे मानधन देण्यात यावे, गटप्रवर्तक व आशा सेविकांना स्वतंत्र कार्यालय मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या आहे. 
धरणे आंदोलनात सिटू संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. शंकरराव दानव, माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी व किसान सभेचे कॉ. ऍड. दिलीप परचाके सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व प्रीती करमनकर, मेघा बांडे, प्रणाली कुचनकर, माधुरी पारेलवार, किरण बोनसुले यांनी केले. या आंदोलनात नमा पथाडे, चंदा मडावी, अनिता जाधव, अनिता काळे, सुनीता कुंभारे, ईशा भालेराव, रिजवाना शेख, सोनाली निमसटक, चंदा पथाडे, कल्पना मजगवळी यांच्यासह मोठ्या संख्येने आशा सेविका सहभागी झाल्या होत्या.
प्रलंबित मागण्यांना घेऊन आशा सेविकांनी केले धरणे आंदोलन प्रलंबित मागण्यांना घेऊन आशा सेविकांनी केले धरणे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.