सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता. ३०) : कोरोना लसीकरणाचा पहिला डोज घेतल्यावर विहित कालावधीनंतर दुसऱ्या डोजसाठी पात्र झाल्यावरही अद्याप बऱ्याच नागरिकांनी लसचा दुसरा डोज घेतलेला नाही, विशेषत: कोव्हॅक्सीन लसच्या दुसऱ्या डोजचा कालावधी केवळ २८ दिवसच असल्याने हा कालावधी पुर्ण करणाऱ्या नागरिकांना पुढील दोन दिवसात दुसरा डोज देण्यात यावा. यासाठी उद्या व परवा दोन दिवस कोव्हॅक्सीन लस देण्यासाठी विशेष लसीकरण केंद्र सुरू करण्याचे व संबंधीत पात्र नागरिकांना तालुका नियंत्रण कक्षाद्वारे दुरध्वनीद्वारे आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज तालुका यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी आज राळेगाव तालुक्यात प्रत्यक्ष भेट देवून कोविड प्रतिबंधाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना, लसीकरण, कोरोना संभाव्य तीसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पुर्वतयारी, खत व बियाण्यांची उपलब्धता व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप या बाबींचा आढावा घेतला.
कोरोनाची लस घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच आदिवासी पाड्यावरील नागरिकांमध्ये जनजागृती करून लसीकरण वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. तसेच बियाण्यांची उपलब्धता व खताचा आढावा घेताना युरियाच्या बफर स्टॉकची माहिती घेतली. तर राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाची उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जावे, त्यांना एनपीए व ओटीएस योजनांची माहिती देवून पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय इमारतीच्या आवारात वृक्षारोपण केले तर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी राळेगाव उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसिलदार डॉ रविंद्रकुमार कानडजे , पोलीस निरीक्षक प्रकाश तूनकुलवार, संबंधीत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच महसुल, आरोग्य, पोलीस, कृषी व नगरपरिषद यंत्रणेचे अधिकारी व बँकांची प्रतिनिधी उपस्थित होते.
तालुक्यातील कोविड उपाययोजना, खत, बियाणे व पीक कर्जाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 30, 2021
Rating:
