सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता. ३०) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री साडेआठ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादात मुख्यमंत्री राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करू शकतात. रेड झोनमध्ये असलेले राज्यातील १८ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हाबंदी उठवण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील लॉकडाऊन सरसकट उठवायचा नाही, बाबत एकमत झाले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची सरासरी संख्या कमी होत असली तरी १८ जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत घट झाली आहे, त्या जिल्ह्यांत लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाण्याचे संकेत मंत्रिमंडळ बैठकीनंतर देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत.
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, त्या जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता दिली जाण्याची शक्यता आहे. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी आहे. दुसऱ्या टप्प्यांत दैनंदिन गरजांशी संबंधित असलेली दुकाने उघडण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात रेडझोनमध्ये असलेले १८ जिल्हे वगळता उर्वरित राज्यांतील जिल्हाबंदी उठवली जाऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे.
