सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.३०) : वणी रेल्वे कोळसा साईडिंग परिसरातील नागरिकांकरिता काळा श्राप ठरली आहे. सायडिंग वरून उडणाऱ्या कोळशाच्या धूळामुळे नागरिकांचं आरोग्य तर धोक्यात आलच आहे, पण वेळोवेळी घराची साफसफाई व स्वच्छता करतांना महिलांच्या नाकी नव आले आहेत.घरातील गॅलरी, खिडकी व फर्श वर सारखी काळी धूळ जमा होत असल्याने महिलांना नेहमी एका हातात झाडू व एका हातात पाण्याची बादली घेऊन घर स्वच्छता अभियान राबवावं लागत आहे. रेल्वे कोळसा साईडींग वरून उडणाऱ्या काळ्या धूळामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांचं जीवनचं काळवंडलं आहे. या कोळशाच्या धूळीमुळेही नागरिकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. फुफ्फुसांचे विकार झाले आहेत. या काळ्या धुळामुळे नागरिकांचं वयोमान कमी होऊ लागलं आहे. नागरिकांच्या घरातील वस्तूंना हात लावले तरी हात काळे होतात, एवढी धूळ उडत आहे. सकाळी उठल्यानंतर वॉश बेसिंग बघितले तर त्यावर पूर्ण काळा धूळ साचलेला असतो. नागरिकांनी सकाळी खेकारले तरी काळे ठसे बाहेर पडतात. तळपाय तर कितीही धुतले तरी काळे कुट्टच दिसतात. तळपाय नेहमी काळे होत असल्याने कित्येकांना वाईजर झाले आहेत. कोळसा साइडिंगवर सतत ट्रकांची ये-जा सुरु असते. तर दिवसातून किमान दोन वेळा तरी रॅक लोड होत असते. त्यामुळे दिवसभर धूळ उडत असतो.
कोळसा साइडिंगवर योग्यरीत्या पाण्याचा मारा न करणे ही पूर्वीचीच परंपरा राहिली आहे. साइडिंगवर पाणी मारण्याचं कंत्राट मिळालेला कोणताही कंत्राटदार योग्यरीत्या पाणी मारतांना दिसत नाही. पाण्याच्या खेप मारण्यातही घोळ केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. पाण्याच्या खेप कमी व नोंद जास्त करण्यात येत असल्याची चर्चा साइडिंगवर ऐकायला मिळत आहे. पाण्याच्या खेपांची नोंद ठेवणाऱ्याला हाताशी धरून वाढीव खेपांच बिल बनवायचं, या कारनाम्यांमुळे कोळसा साइडिंग कधीच ओलीगच्च राहतांना दिसली नाही. त्यामुळे धुळीची समस्या आजही जैसे थे च आहे. प्रवासी रेल्वे सुरु झाल्यानंतर कोळशाची साइडिंग रहिवासी ठिकाणांपासून दूर नेली जाईल, अशी चर्चा खूप दिवस चालली. पण आजही आसपासच्या परिसरातील नागरिकांना उडणाऱ्या धुळीचा त्रास सहन करावाच लागत आहे.
जवळपास ३० वर्षांपासून रेल्वे कॉलनीतील रहिवासी या कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त आहेत. रात्री बे रात्री होणारी कोळशाची लोडींग व ट्रकच्या आवाजांमुळे रहिवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
धुळीमुळे घर, आंगण, शरीर तर काळ होतच आहे, पण ट्रक व लोडरच्या आवाजामुळे झोपमोड होऊन रात्रही काळी होत आहे. रेल्वे साइडिंगच्या काही अंतरावरच गौरकार ले-आऊट व विठ्ठलवाडी परिसर आहे. या परिसरातील जनता कोळसा साइडिंग वरून उडणाऱ्या धुळामुळे कमालीची वैतागली आहे. रेल्वे कॉलनीतील नागरिक तर नाईलाजास्तव हा त्रास सहन करतच आहे. पण आता पॉश वस्त्यांनाही हा त्रास जाणवू लागला आहे. कित्येक जण या काळ्या धूळामुळे नेहमीच आजारी पडत आहे. गौरकार ले-आऊट व विठ्ठलवाडी परिसरातील घर, रस्ते, झाडी, वेली सर्वच कसं काळभोर दिसून येत आहे. हवा काळी, पाणी काळ, कपड्यांवरही काळा धूळ जमा होतो. काळ्या वातावरणात या परिसरातील नागरिकांना आणखी किती दिवस वावरावं लागेल, कोण जाणे.
पाण्याचं नुसतं कंत्राट बदलते, धूळ मात्र पूर्वी उडायचा तसा आजही उडतो. ना कोळशाच्या ढिगाऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात येतो, ना ट्रक जाणाऱ्या रस्त्यांवर बरोबर पाणी मारलं जातं. याकडे न वेकोली प्रशासनाचं लक्ष आहे, न स्थानिक प्रशासनाचं. नागरिक सहन करत आहे ना त्रास, सवयच झाली आहे त्यांना आता काळ्या धुळीत राहण्याची, हे वेकोली प्रशासनानं हेरून घेतलं आहे. या काळ्या धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे, याची कुणालाही पर्वा राहिलेली नाही. पण आता नागरिकांची सहन शक्ती अगदीच टोकावर आली आहे. सतत उडणाऱ्या काळ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकही आता चिडले आहेत. वेकोली प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे त्यांचा संताप वाढू लागला असून साइडिंगवर धरणे आंदोलन करण्याकरिता ते एकवटू लागल्याचे परिसरात ऐकायला मिळत आहे.
वणी रेल्वे साईडींग वरून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांचं जीवनचं काळवंडलं !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 30, 2021
Rating:
