सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : तालुक्यातील चारगाव येथील मुख्य चौकातील एका बारमागील शेतात असलेल्या विद्युत डीपीमध्ये काम करत असताना कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे चारगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद महादेव कुळसंगे (३५), रा. निंबाळा, ता. वणी, जि. यवतमाळ असे मृतक कंत्राटी वायरमनचे नाव आहे. विद्युत डीपीमध्ये काम सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, वणी येथे पाठविण्यात आला.
दरम्यान, घटनेची माहिती गावात व परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. विनोद कुळसंगे हे डीपीमध्ये नेमक्या कोणत्या परिस्थितीत काम करीत होते, तसेच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचा तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुळसंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने नातेवाईक व परिचितांमध्ये शोककळा पसरली असून, चारगावसह निंबाळा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


