सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे, अमली पदार्थ, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका लावल्याचे चित्र दिसून येत आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असताना मारेगाव पोलीस ठाण्याकडूनही अशाच प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परिसरातील अनेक भागांत अवैध धंद्यांवर कारवाई, संशयितांवर लक्ष ठेवणे, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई आणि वाहतूक शिस्तीबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
नुकतेच मारेगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या ठाणेदार सागर दानडे यांच्याकडे नागरिकांच्या अपेक्षा लागून आहेत. नवीन ठाणेदार म्हणून त्यांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत प्रभावी नियोजनाद्वारे कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.
तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग आणि नागरिकांचे म्हणणे आहे की, अवैध धंद्यांवर अंकुश, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, शाळा-महाविद्यालय परिसरात गस्त वाढविणे तसेच रात्रीच्या वेळी संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
दरम्यान, उपविभागीय क्षेत्रात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर "मारेगावातही अशीच कठोर आणि परिणामकारक मोहीम कधी सुरू होणार?" असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे ठाणेदार सागर दानडे हे येत्या काळात ॲक्शन मोडवर येत मारेगावात कायदा व सुव्यवस्थेचा नवा आदर्श निर्माण करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.