टॉप बातम्या

वडगाव (धं) भूखंड फसवणूक प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरालगतच्या वडगाव (धंदीर) येथील भूखंड विक्री प्रकरणात खोटे दस्तावेज तयार करून आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून अखेर वणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी राजू डोंगरे, तत्कालीन तलाठी रविंद्र उपरे, शैलेश दादाजी वाकडे आणि अर्जनवीस सतीश केराम यांच्याविरुद्ध BNS कलम 318(4), 336(3), 340(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 विशेष म्हणजे, तक्रारीनंतर तब्बल दीड वर्ष कारवाई न झाल्याने संतप्त पत्रकारांनी शुक्रवारी वणी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन छेडले. जवळपास पाच तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर रात्री उशिरा पोलिसांनी एफआयआर दाखल केली.

तक्रारदार पत्रकार सूरज चाटे आणि संध्या तरवटकर यांनी जुलै 2024 मध्ये वडगाव येथील भूखंड खरेदीसाठी सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा व्यवहार केला होता. त्यानंतर फेरफार नोंद व सातबारा त्यांच्या नावे करण्यात आला. मात्र पुढील चौकशीत संबंधित फेरफार बनावट असल्याचे आणि मूळ मालक वेगळाच असल्याचे उघड झाले. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला. अखेर शुक्रवारी 20 ते 25 पत्रकारांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडत ठाणेदार गोपाल उंबरकर यांना जाब विचारला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतरही कारवाईस विलंब का झाला, असा सवाल उपस्थित करण्यात आला. आंदोलनामुळे वातावरण तापल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सर्व पुरावे उपलब्ध असतानाही महसूल विभागातील अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून, पोलीस व महसूल प्रशासनातील संगनमताच्या चर्चांना उधाण आले आहे. 

पत्रकारांच्या समर्थनार्थ माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये भेट देत चर्चा केली, तर आमदार संजय देरकर यांनीही रात्री उशिरा पोलीस स्टेशन गाठून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. याशिवाय महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी काही वरिष्ठ अधिकारी व राजकीय स्तरावर प्रयत्न झाल्याचीही चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();