सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
मारेगाव : भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आयोजित 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६' अंतर्गत दोन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण वर्ग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. निळोना येथील पंडित दीनदयाल प्रबोधिनी येथे १६ व १७ मे रोजी आयोजित या निवासी प्रशिक्षण वर्गात जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
प्रशिक्षण वर्गात आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते मदन येरावार, जिल्हा प्रभारी आमदार सुमित वानखेडे, आमदार राजू तोडसाम, नगराध्यक्षा अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्यासह जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष, महामंत्री तसेच विविध आघाडी व मोर्चांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रशिक्षण वर्गामध्ये भारतीय जनता पक्षाची विचारधारा, संघटनात्मक रचना, कार्यकर्त्यांचे दायित्व, पक्षाचा इतिहास व विकास, कार्यविस्ताराची दिशा, वैचारिक अधिष्ठान, विचार परिवार, कार्यकर्ता विकास व संघटन मजबुतीकरण यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच देशासमोरील विविध आव्हाने, त्यावरील उपाययोजना, केंद्रातील मोदी सरकारच्या गरीब कल्याणकारी योजना, सेवा आणि सुशासन यावरही मार्गदर्शकांनी आपले विचार मांडले.
सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा प्रभावी वापर, नमो अॅप, सरल (SARAL) अॅप, मीडिया व्यवस्थापन, संवाद कौशल्य, संघटनात्मक नियोजन तसेच व्यावहारिक सत्रांद्वारे कार्यकर्त्यांना आधुनिक राजकीय कार्यपद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले. सरल अॅपद्वारे प्रशिक्षण नोंदणी, प्रश्नमंजुषा व डिजिटल व्यवस्थापन याचीही माहिती देण्यात आली.
मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार आणि केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटन अधिक सक्षम करण्यासाठी हे प्रशिक्षण मार्गदर्शक ठरणार असल्याची भावना यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी व्यक्त केली.