सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील आदर्श हायस्कूलच्या सन २००२-०३ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल तेवीस वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा केला.
अनेक वर्षांनी शाळेच्या आवारात पाऊल ठेवताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता आणि जुन्या आठवणींचा भावनिक ओलावा स्पष्ट दिसून येत होता. एकेकाळी एकाच बाकावर बसणारे, एकत्र खेळणारे आणि स्वप्नांच्या दुनियेत रमणारे मित्र आज आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावले असले तरी, त्यांच्या मनातली शाळा आणि मैत्री तशीच जिवंत असल्याचे या भेटीत जाणवले.
या स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांची भेट घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील खोड्या, अभ्यासाचे दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबत घालवलेले क्षण आठवताच वातावरणात हास्य आणि भावनांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. अनेकांनी वर्षानुवर्षांनंतर भेटलेल्या मित्रांना मिठी मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर काहींच्या डोळ्यांत नकळत आनंदाश्रू दाटून आले. कार्यक्रमादरम्यान काढण्यात आलेला समूह फोटो हा उपस्थितांसाठी आयुष्यभर जपून ठेवावा असा खास क्षण ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने वातावरण अधिक भावूक झाले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकी, परस्परांबद्दलचा आदर आणि शाळेबद्दलची आत्मीयता प्रत्येक क्षणातून दिसून येत होती. आदर्श हायस्कूलने केवळ शिक्षणच दिले नाही, तर जीवनमूल्ये आणि संस्कारांची शिदोरी दिली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
हा स्नेहमिलन सोहळा म्हणजे फक्त मित्रांची भेट नव्हती, तर आयुष्याच्या धावपळीत हरवलेल्या नात्यांना पुन्हा नव्याने जपण्याचा संस्मरणीय प्रयत्न ठरला.