सह्याद्री चौफेर | संपादकीय
मारेगाव : एकेकाळी राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आणि नेतृत्वाच्या दृष्टीने चर्चेत असलेला मारेगाव तालुका आजही विकासाच्या प्रतीक्षेत उभा असल्याचे चित्र दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अतिमागास तालुक्यांमध्ये गणना होणाऱ्या या तालुक्यात अनेक गंभीर प्रश्न वर्षानुवर्षे कायम असून, बदलत्या सरकारांसोबत आश्वासनांची मालिका सुरू राहिली; मात्र प्रत्यक्षात जनतेच्या जीवनमानात अपेक्षित बदल झालाच नाही, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
तत्कालीन सरकारच्या काळात मारेगाव तालुक्याची राजकीय चलती मोठ्या प्रमाणात होती. अनेक नेते, पुढारी, पदाधिकारी या भागात सक्रिय होते. विशेषतः मार्डी सर्कल हे तालुक्यातील “पॉवरफुल” राजकीय केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. या परिसरातून अनेक राजकीय समीकरणे ठरत होती. गावागावात कार्यकर्त्यांची फौज उभी राहिली, सभा, बैठका, दौरे आणि राजकीय रणनीती यामुळे हा भाग कायम चर्चेत राहिला. परंतु “गावची गंगा आणि टोंगळ्याला सांगा” अशी अवस्था मात्र विकासाच्या बाबतीत आजही कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वनोजा देवी, शिवणी, पार्डी, मुकटा, हिवरा, मार्डी, बोदाड-केगाव, फेपरवाडा या भागातील रस्त्यांची अवस्था आजही अत्यंत दयनीय आहे. अनेक रस्ते अक्षरशः अखेरच्या घटका मोजत असून, पावसाळ्यात या गावांची वाताहत परिस्थिती निर्माण होते. इतकी वर्ष सत्ता भोगूनही ग्रामीण रस्त्यांचे जाळे सक्षम करता आले नाही, ही मोठी शोकांतिका असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. निवडणुकीच्या काळात विकासाच्या घोषणा मोठ्या प्रमाणावर झाल्या; मात्र प्रत्यक्षात रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अनेक ग्रामस्थांनी परिस्थितीमुळे शेजारील जिल्ह्यांकडे स्थलांतर करण्याचा मार्ग स्वीकारला. मुलांच्या शिक्षणासाठी योग्य सुविधा नाहीत, आरोग्य सेवा अपुऱ्या आहेत, तर दळणवळणाची साधने अत्यंत मर्यादित आहेत. गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण होते, तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे “विकासाच्या गप्पा वेगळ्या आणि वास्तव वेगळे” अशी भावना आता जनतेत अधिक तीव्र होत आहे.
दर निवडणुकीला गावागावात जाऊन जनतेच्या दारी उभे राहणारे नेते निवडणूक संपताच पुन्हा दिसेनासे होतात, अशी नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत. “फक्त निवडणुका आल्या की जनता आठवते, बाकी दिवस बिरादारी” अशी बोचरी टीका आता उघडपणे होत आहे. अनेक वर्षे आश्वासने, भूमिपूजन आणि घोषणांचा पाऊस पाहिलेल्या जनतेचा आता संयम सुटू लागला असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता आपली भूमिका स्पष्टपणे मांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या अनेक दशकांपासून राजकीय वर्चस्वाची चर्चा झाली, परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात किती बदल झाला, हा खरा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. “गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, आता विकासाच्या नावावर केवळ राजकारण नको तर प्रत्यक्ष काम हवे, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, तालुक्यातील युवक वर्ग, शेतकरी आणि सुशिक्षित नागरिकांमध्येही बदलाची चर्चा सुरू झाली आहे. “आता पुन्हा जुन्याच यातना भोगायच्या नाहीत” असा सूर उमटू लागला असून, नागरिक आगामी निवडणुकांकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. कोणाची जिरवायची आणि कोणाची मिरवायची हे येणारा काळ ठरवेल; मात्र मारेगाव तालुक्याच्या विकासाचा मुद्दा आता केंद्रस्थानी येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.