लेखी आश्वासनानंतर मारोती गौरकार यांचे उपोषण स्थगित



सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : नियमित पीक कर्जाची परतफेड करूनही नवीन खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नवीन पीक कर्जाचे वाटप झाले नसल्याने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव तथा आदि.वि.का. सहकारी संस्थेचे संचालक मारोती माधव गौरकार यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य प्रशासकांकडे निवेदन सादर करून तातडीने पीक कर्ज वाटप सुरू करण्याची मागणी केली होती.

या संदर्भात बँक प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, सन २०२५-२६ मध्ये बँकेने ४०६.८३ कोटी रुपयांची कर्जवसुली केली असून त्यापैकी २२३.५५ कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मिळणारी अल्पमुदत फेरकर्ज मर्यादा (ST-SAO) अद्याप मंजूर झाली नसल्याने निधीअभावी नवीन खरीप पीक कर्ज वाटपास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

बँकेने पुढे स्पष्ट केले की, दि. २ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे ५४३ कोटी रुपयांच्या कर्ज मर्यादेची मागणी करण्यात आली असून, ती मंजूर होताच पुढील आठवड्यापासून पीक कर्ज वाटप पूर्ववत सुरू करण्यात येईल.
दरम्यान, या प्रश्नावरून आज १४ मे रोजी दुपारी ४ वाजता आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, संबंधित प्रशासनाने मागणीची दखल घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिल्याची माहिती मारोती गौरकार यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असल्याने प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();