सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीच्या चर्चांना उधाण आले असून, काही नाराज चेहरे विद्यमान गटबाजीला कंटाळून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या घडामोडींमुळे आता वणी विधानसभा क्षेत्रात नव्या राजकीय समीकरणांची नांदी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या दाव्यानुसार, प्रमुख कार्यकर्ते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो यामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पक्षांतर्गत अस्वस्थता, निर्णय प्रक्रियेत होत असलेली उपेक्षा आणि “घरातच मोकळेपणाने काम करण्याची संधी मिळत नाही” अशी भावना काही स्थानिक नेत्यांमध्ये वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी नव्या राजकीय पर्यायाच्या शोधात असल्याचे संकेत मिळत आहेत.
या संभाव्य घडामोडींमुळे तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असली तरी संबंधित नेते किंवा पदाधिकारी स्पष्ट भूमिका घेण्यास टाळाटाळ करत आहेत. अत्यंत मोजक्या शब्दांत बोलून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी राजकीय वातावरण मात्र दिवसेंदिवस तापताना दिसत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशा चर्चांना सातत्याने उधाण येत असल्याने, “हे खरोखरच मोठ्या राजकीय बदलाचे संकेत आहेत की केवळ प्रसिद्धीसाठी मुद्दाम निर्माण केलेला संभ्रम?” असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे.