सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : नवीन खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा आदिवासी विकास कार्य सहकारी संस्थेचे संचालक श्री. मारोती माधव गोरकर यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य प्रशासकांना निवेदन देऊन तातडीने कर्जवाटप सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहकारी संस्थांचे जुने कर्ज ३१ मार्चपूर्वी नियमितपणे भरले आहे. मात्र त्यानंतरही नवीन पीक कर्ज मंजूर व वितरित करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. नवीन हंगामासाठी बियाणे, खते व इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील हंगामात नापिकी झाल्यामुळे अनेक शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडले असून शेतीमालाला अपेक्षित बाजारभावही मिळाला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करूनही बँक प्रशासनाकडून पीक कर्ज वाटपात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
मारेगाव तालुका हा आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक गंभीर असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी संस्थांच्या तांत्रिक बाबींची कारणे पुढे करून वेळकाढूपणा न करता तातडीने कर्जवाटप प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी सरपंच तुळशीराम कुमरे, भाऊसाहेब पाचभाई यासह अनेक युवा शेतकरी बांधव उपस्थित होते.