सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी तालुक्यातील वागदरा आणि नांदेपेरा परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध दारूविक्रीमुळे संतप्त झालेल्या महिलांनी आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गावातील वाढते व्यसन, उद्ध्वस्त होत चाललेली कुटुंब व्यवस्था आणि युवकांचे बिघडते भविष्य याविरोधात महिलांनी पोलिस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
वागदरा येथील महिलांनी काही दिवसांपूर्वी वणी पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली होती. मात्र अपेक्षित कारवाई न झाल्याने महिलांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट घेत आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात महिलांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठत ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्याशी चर्चा केली.
महिलांच्या आरोपानुसार, गावात काही व्यक्ती खुलेआम अवैध दारूविक्री करत असून त्यामुळे तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. अनेक घरांमध्ये कौटुंबिक कलह वाढले असून काही कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचा दावा महिलांनी केला. याशिवाय परिसरात जुगार अड्डे आणि गांजाची विक्रीही सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
नांदेपेरा येथील महिलांनीदेखील गावातील अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी करत पोलिस प्रशासनाने ठोस मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. अवैध दारूविक्रेते, जुगार अड्डे चालक आणि अमली पदार्थ विक्रेत्यांवर पुढील तीन दिवसांत कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महिलांनी दिला.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया, सुधाकर गोरे, राहुल पारखी, शुभम गोरे, किशोर नांदेकर, नरेंद्र बदखल, मिनानाथ काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.