टॉप बातम्या

“हम सब चोर हैं…” — मारेगाव तालुका नेमका चाललाय कुठे?


सह्याद्री चौफेर | संपादकीय 

मारेगाव : मारेगाव तालुक्यात आज सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न घर करून बसला आहे. “कायद्याचे राज्य खरंच उरले आहे का?”
कारण तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेले अवैध धंदे, प्रशासनाची निष्क्रियता आणि त्यावर होणारे मौन हे चिंतेचे कारण बनले आहे.

अवैध मटका, अदृश्य जुगार अड्डे, खुलेआम सुरू असलेली दारू विक्री, प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा व्यापार, गांज्याची विक्री, रेती तस्करी, मुरूम चोरी, पशुधन तस्करी अशा अनेक बेकायदेशीर प्रकारांनी तालुक्याचा चेहरामोहरा बदलत चालला आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार सामान्य जनतेच्या नजरेसमोर सुरू असताना संबंधित विभाग मात्र “कारवाई सुरू आहे” या पारंपरिक उत्तरापलीकडे जाताना दिसत नाहीत.

गावोगावी आज तरुणांच्या हातात रोजगार नसून व्यसनाचे साधन दिसत आहे. काही ठिकाणी जुगाराचे अड्डे आणि मटक्याच्या पाट्या शाळा–महाविद्यालयांच्या परिसरातही चर्चेचा विषय ठरत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांनी नेमका कोणाचा आदर्श घ्यावा, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

कायद्यावर बोट ठेवणारे, समाजाला दिशा देणारे, नैतिकतेचे धडे देणारे लोक आज कुठे गेले आहेत? जे आवाज अन्यायाविरोधात उठायला हवे होते, तेच आवाज आता शांत का आहेत? ही शांतता केवळ योगायोग आहे की कुठेतरी “हात ओले” झाल्याची चर्चा खरी आहे, प्रशासनाच्या मौनाने वाढला अवैध कारभार,असा संशय नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

तालुक्यात निर्माण झालेली ही भयावह स्थिती केवळ गुन्हेगारी वाढल्यामुळे नाही, तर लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्यामुळे अधिक गंभीर बनत आहे. प्रशासन, संबंधित विभाग, स्थानिक नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी यांनी वेळेत कठोर भूमिका घेतली नाही तर परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.

आज सामान्य नागरिकांमध्ये अशी भावना निर्माण होत आहे की, “जे थांबवू शकतात तेच गप्प आहेत, आणि जे बोलू शकतात तेच थांबले आहेत…” म्हणूनच लोकांच्या तोंडी उपरोधिकपणे एकच वाक्य ऐकू येत आहे.

“हम सब चोर हैं…”
ही केवळ म्हण नाही, तर व्यवस्थेवरील वाढत्या अविश्वासाची तीव्र प्रतिक्रिया आहे.
आता तरी प्रशासन जागे होणार का?
कायद्याचे राज्य पुन्हा दिसणार का?
की सर्व काही असेच सुरू राहणार?
हा प्रश्न आज संपूर्ण मारेगाव तालुका विचारत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();