सह्याद्री चौफेर | रवी वल्लमवार
पांढरकवडा : पतीपासून वेगळी राहत असलेल्या एका महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गोपालपूर (कोलाम पोड) येथे सोमवारी (दि. १८ मे) सकाळी उघडकीस आली. कमलाबाई हुसेन मेश्राम (वय ५१) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणात पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले आहे. मात्र वृत्त लिहीपर्यंत त्याच्याकडून कोणताही अधिकृत जबाब नोंदविण्यात आलेला नव्हता.
माहितीनुसार, कमलाबाई मेश्राम या गोपालपूर येथील कोलाम पोड परिसरात वास्तव्यास होत्या. त्यांचा विवाह हुसेन गट्टू मेश्राम (वय ५७) यांच्यासोबत झाला होता. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. पती हुसेन हा पत्नीवर संशय घेत वारंवार वाद घालत असल्याने, त्रासाला कंटाळून कमलाबाई यांनी पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता.
सोमवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कमलाबाई यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. “कमलाबाई यांची हत्या झाली असून त्यांचा मृतदेह सदाशिव वाघधरे यांच्या घराच्या अंगणात पडला आहे,” अशी माहिती नातेवाईकांना देण्यात आली. माहिती मिळताच मृत महिलेचे भाऊ चंद्रभान आत्राम यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, कमलाबाई या अंगणात डाव्या कुशीवर पडलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल वार करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
ही घटना रविवारी मध्यरात्री १ ते सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील रमेश कुंटलवार यांना देण्यात आली. त्यानंतर पांढरकवडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
संशयातून घडले हत्याकांडमृतक कमलाबाई या पतीपासून दोन घरे अंतरावर वेगळ्या राहत होत्या. त्यांचे इतर कोणासोबत संबंध असल्याचा संशय पती हुसेन मेश्राम याला होता. या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असल्याची माहिती फिर्यादी भावाने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे संशयातूनच हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पांढरकवडा पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.