सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील हिवरा ते वनोजा (देवी) या महत्त्वाच्या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून सध्या हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच डागडुजी करण्यात आली असतानाही काही दिवसांतच रस्त्याची पुन्हा चाळण झाली, यावरून कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांची ये-जा असते. मात्र मोठमोठे खड्डे, उखडलेली डांबरीकरणाची पातळी आणि असमान रस्त्यामुळे प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीवाशी खेळ ठरत आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत असून अपघाताची भीती कायम डोक्यावर आहे.
स्थानिक नागरिकांची वारंवार ओरड असूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचीच खैरात होत असल्याचा आरोप होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे या गंभीर समस्येकडे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष देत रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिकांचा संताप उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“सदर रस्त्याचे काम योग्य दर्जाने झालेले नाही. केवळ तात्पुरती डागडुजी करून बिले लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित विभागाने कामाची गुणवत्ता तपासूनच बिले मंजूर करावीत. नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणारे काम अजिबात सहन केले जाणार नाही.”— पुरुषोत्तम बुटेतालुका प्रमुख, शिवसेना (उबाठा), मारेगाव
“रस्त्याची डागडुजी करण्यात आली असली तरी काम पूर्णपणे अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून उर्वरित काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, ही आमची ठाम मागणी आहे.”
— निलेश रासेकर
सरपंच, ग्रामपंचायत शिवणी (धोबे)
“वनोजा देवी मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्डे, धूळ व असमान पृष्ठभाग यामुळे केवळ प्रवासच कठीण होत नाही, तर आरोग्यावरही परिणाम होत असून विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न तातडीने सोडवून संबंधित रस्ता उच्च प्रतीचा करण्यात यावा, ही आमची आग्रही मागणी आहे.”— पवन ढवसअध्यक्ष, भाजपा किसान आघाडी मोर्चा, मारेगाव