सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील तब्बल ३२ ग्रामपंचायतींची मुदत संपून जवळपास एक महिना उलटला असतानाही अद्याप ना निवडणुका घेण्यात आल्या आहेत, ना प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परिणामी, संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायती ‘सरपंचविना’ झाल्या असून विविध विकासकामे ठप्प पडली आहेत.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. मात्र, लोकप्रतिनिधींचा अभाव असल्यामुळे पाणीपुरवठा, दुरुस्तीची कामे तसेच इतर आवश्यक विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मारोती गौरकार यांनी शासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. “एकीकडे शासन ग्रामपंचायत निवडणुका घेत नाही, तर दुसरीकडे प्रशासकांचीही नियुक्ती करत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकाही प्रलंबित असल्यामुळे लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. “लोकशाही राज्यात लोकप्रतिनिधी नसतील तर गावांचा विकास कसा होणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पुढे इशारा देताना मारोती गौरकार म्हणाले की, “आठ दिवसांत ग्रामपंचायतींसंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही, तर मोठे आंदोलन छेडण्यात येईल.”
दरम्यान, तालुक्यातील नागरिकांकडून तात्काळ प्रशासकांची नियुक्ती किंवा निवडणुका जाहीर करण्याची मागणी जोर धरत असून शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.