सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : संगीत गुरु हिरासुका लिंगो राज्यस्तरीय आदिवासी परधान समाज समितीच्या वतीने आयोजित आदिवासी परधान समाज वधू-वर परिचय मेळावा शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्यात महाराष्ट्रभरातील परधान समाजातून निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान करण्यात येत समाजाच्या राजकीय व सामाजिक उन्नतीचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय परधान जनजाती उत्थान संघटन, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष के.पी. प्रधान होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी छत्तीसगड जनजाती आयोगाचे अध्यक्ष रुपसिंग मंडावी, राष्ट्रीय प्रचारक राधेश्याम काकोडीया, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप गेडाम, वंदना कुळमते, दशरथ मडावी, नरेंद्र पोयाम, महेश सिडाम, मनोज गेडाम, शंकर मडावी, एम. के. कोडापे, सुरेश चिंचोळकर, नरेश गेडाम, बंडू सोयाम, सुरेश किनाके, अशोक मेश्राम, देव कनाके, भोला मडावी, विद्या आत्राम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वागताध्यक्षांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये विजयी ठरलेल्या परधान समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. अशोक उईके यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात के.पी. प्रधान यांनी परधान जमातीचा इतिहास, परंपरा व सांस्कृतिक वारसा यावर प्रकाश टाकत सांगितले की, देशातील सुमारे ११ राज्यांमध्ये परधान जमातीचे वास्तव्य असून संगीत गुरु हिरासुका लिंगो हे समाजाचे आद्य गुरु आहेत. समाजाने एकत्र येऊन शिक्षण, रोजगार व नेतृत्व विकासावर भर देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
🔸 वधू-वर परिचयातून नातेसंबंधांना बळ
मेळाव्यात आयोजित वधू-वर परिचय सत्राला विशेष प्रतिसाद मिळाला. अनेक युवक-युवतींनी आपली माहिती सादर करत पारंपरिक पद्धतीने ओळखी वाढवल्या. या उपक्रमामुळे समाजात सुसंवाद वाढून नवीन नातेसंबंध निर्माण होण्यास चालना मिळाली.
🔸 ९ राज्यांतील समाजबांधवांची ऐतिहासिक उपस्थिती
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि आसाम या नऊ राज्यांतील परधान समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, अकोला, अमरावती, बीड, किनवट (नांदेड) आदी जिल्ह्यांमधूनही समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
🔸 संघटन बळकट करण्याचा निर्धार
कार्यक्रमातून समाज संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि राजकीय सहभाग वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या यशस्वी आयोजनासाठी बंडू मेश्राम, नंदू अरके, राजेश गेडाम, अशोक गेडाम, अरुण पोयाम, पुरुषोत्तम घोडाम, राजू किनाके, किशोर सलामे, सुभाष गेडाम, डॉ. ताराचंद गेडाम, विजय मडकाम, पवन मंगाम, आकाश चांदेकर, गजानन किनाके, हरीश तोडसाम आदींनी परिश्रम घेतले.
