सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : पेट्रोल मिळणार नाही, अशी अफवा पसरताच मार्डी परिसरातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी दुपारपासून मोठी गर्दी केली. अनेकांनी दुचाकींमध्ये अतोनात पेट्रोल भरून घेतल्याने अखेर पंपावर ‘नो स्टॉक’चा फलक लावण्याची वेळ आली.
अफवेचा वेग वाढताच केवळ स्थानिकच नव्हे, तर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, माढेळी, तसेच वणी, मारेगाव परिसरातूनही मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांनी मार्डीकडे धाव घेतली. परिणामी, काही तासांतच पेट्रोल-डिझेलचा साठा संपला आणि पंपावर लाईन दोरी लावून ग्राहकांना परत जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचे चित्र दिसून आले.
आजच्या हायटेक युगात शहरी असो वा ग्रामीण भाग, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात दुचाकी वाहन अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे पेट्रोलच्या संभाव्य टंचाईच्या भीतीने नागरिकांनी घाईगडबडीत टाक्या फुल करून घेतल्या. मात्र या अनियोजित गर्दीमुळे अनेक स्थानिक वाहनचालकांना पेट्रोल मिळाले नाही आणि त्यांना ‘नो स्टॉक’चा फटका बसला.
दरम्यान, संबंधित विभागाकडून किंवा अधिकृत स्रोतांकडून कोणतीही टंचाई जाहीर करण्यात आलेली नसतानाही अफवेमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.