सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, या सर्व बेकायदेशीर व्यवसायांवर तत्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना व युवासेना (शिंदे गट) च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी, वणी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वणी शहर व लगतच्या परिसरात सुगंधित तंबाखू विक्री, गांजा व ड्रग्स विक्री, सट्टापट्टी व्यवसाय तसेच अवैध रेती तस्करी हे समाजविघातक धंदे खुलेआम सुरू आहेत. या अवैध व्यवसायांचा परिणाम थेट कुटुंबव्यवस्थेवर होत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. विशेषतः युवक व विद्यार्थी वर्ग व्यसनाधीन होऊन गुन्हेगारीकडे वळत असल्याने समाजाच्या भवितव्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. सुगंधित तंबाखूच्या वाढत्या सेवनामुळे कर्करोगासारख्या घातक आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
यासोबतच वणी परिसरातील औद्योगिक कंपन्या व कोळसा खाणींमध्ये स्थानिक युवकांना डावलून परप्रांतीय व बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवक रोजगाराच्या संधींपासून वंचित राहत असून सामाजिक असंतोष वाढत आहे. स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार देण्यासाठी स्पष्ट धोरण ठरवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी युवासेनेचे जिल्हा सचिव प्रतीक गौरकार यांनी केली आहे. यापूर्वीही अनेक वेळा निवेदने सादर करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून, वेळीच दखल न घेतल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

