सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : गावाच्या सर्वांगीण प्रगतीचे केंद्रबिंदू असलेली ग्रामपंचायत ही केवळ प्रशासकीय यंत्रणा नसून, गावाच्या भविष्यास आकार देणारे हृदय आहे, असे प्रतिपादन तहसीलदार उत्तम निलावाड यांनी केले. तालुक्यातील सावंगी (संगम) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
दि. ३१ डिसेंबर रोजी आयोजित या लोकार्पण सोहळ्यात तहसीलदार निलावाड यांच्या शुभहस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती मारेगावचे सहाय्यक गटविकास अधिकारी राठोड उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार निलावाड म्हणाले की, ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे केवळ चार भिंतींची इमारत नाही, तर गावाच्या विकासाचा आराखडा इथूनच तयार होतो. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर येथेच चर्चा होऊन निर्णय घेतले जातात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या अधिक संवेदनशील आणि लोकाभिमुख असतात, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला सरपंच संघटना व भाजप मारेगाव तालुका अविनाश लांबट, सरपंच रामचंद्र जवादे, माजी सरपंच पांडुरंग पाटील नन्नावरे, सरपंच प्रविण नान्ने, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर भिडकर, विलास भोगांडे, सावंगी (संगम) चे सरपंच अभिजित मांडेकर, मेघराज ताजणे तसेच ग्रामपंचायत सचिव राखी रेवतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.