सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील पंचशील नगर परिसरात ८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या सुगंधित तंबाखू जप्ती प्रकरणात पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेविरोधात युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून संबंधित तपास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे, तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने व आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जागरूक नागरिकांनी ‘११२’ क्रमांकावर दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू जप्त केली होती. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असतानाही, प्रत्यक्ष गुन्ह्यात वापरलेली MH-24-BL-7051 व MH-24-BL-7951 ही वाहने आजतागायत जप्त करण्यात आलेली नाहीत. सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्ष साक्षीदार उपलब्ध असतानाही महिनाभराचा कालावधी उलटून गेला, ही बाब पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तपासातील जाणीवपूर्वक दिरंगाईमुळे तंबाखू तस्करीमागील आर्थिक साखळी व सूत्रधार उघड होण्यास अडथळा येत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. संबंधित तपास अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद असून, अशा बेकायदेशीर धंद्यांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. युवासेनेने ४८ तासांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी युवासेना समन्वयक आयुष ठाकरे, शिवसेना तालुका प्रसिद्धी प्रमुख सुरेश शेंडे आदी उपस्थित होते.