सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मुकुटबन येथील RCCPL MP BIRLA सिमेंट कंपनी मधील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज (6 नोव्हेंबर 2025) पहाटे पाच वाजल्यापासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. हे आंदोलन जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन (आयटक) च्या नेतृत्वाखाली सुरु झाले असून कामगारांनी 100 टक्के प्रतिसाद दिला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे अध्यक्ष व वणी विधानसभा क्षेत्रातील प्रखर लढवय्ये नेते कॉ. अनिल हेपट करीत आहेत. त्यांच्यासह अनिल घाटे, मोरेश्वर कुंटलवार, दिनेश शिटलवार, पंढरी नांदेकर, प्रविण कुळेकर, अनिल मोंडे, महादेव मेश्राम, कवडू केळझरकर, रोषन चामाटे, कलीम शेख आणि निरज खैरकर, अक्षय पुल्लीवार हे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.
कामगारांनी कंपनी प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटममध्ये किमान वेतनानुसार वेतन देणे, कामाचे तास कामगार संहितेनुसार ठेवणे, तसेच कार्यस्थळाचे वातावरण सुविधाजनक बनविणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती युनियनतर्फे देण्यात आली आहे.