सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : शिवसेनेचे निष्ठावान व कार्यक्षम पदाधिकारी म्हणून ओळख असलेले दिवाकर नामदेवराव सातपुते हे पंचायत समिती मारेगाव निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत.
सातपुते हे गेल्या २९ वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असून, त्यांनी ग्रामपंचायत चिंचमंडळचे उपसरपंच म्हणून कार्य केले आहे. तसेच ते सतत ग्रामपंचायत सदस्य राहिले असून, स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे.
त्यांनी दोन वेळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढवली, तर २०१७ मध्ये कुंभा गणातून पंचायत समिती सदस्यपदासाठी ‘बी’ फार्म दाखल केला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी त्यावेळी उमेदवारी मागे घेतली होती.
सध्या ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) मारेगाव तालुका सचिव पद सांभाळत असून, शेतकरी, शेतमजूर, अवैध धंदे, रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या लोकजीवनाशी निगडित प्रश्नांवर त्यांनी प्रभावी आवाज उठवला आहे.
स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये मत आहे की, “अशा प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तीची पंचायत समितीत गरज आहे.” त्यामुळे दिवाकर सातपुते हे कुंभा गणातील प्रबळ उमेदवार म्हणून पुढे येण्याची चर्चा सध्या जोरात असून, त्यांच्या १०१ टक्के उमेदवारीच्या शक्यता कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहेत.