टॉप बातम्या

वणी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) स्वतंत्रपणे रिंगणात; महाविकास आघाडीत मतभेद शिगेला


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या मतभेदाचा परमोच्च बिंदू गाठत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांनी वणी नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज १५ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाने ही अधिकृत घोषणा केली.

यावेळी पत्रकार परिषदेस प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा उपाध्यक्ष समीर बेग, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अरबाज पठाण, तालुका अध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, रामकृष्ण वैद्य, प्रदीप खोब्रागडे, महेंद्र चांदोरे, नरेंद्र लोणारे, खुशाल बासमवार आदी मान्यवर उपस्थित होते.

वणी नगरपरिषदेतील १४ प्रभाग आणि नगराध्यक्ष पदासह एकूण २९ जागांसाठी निवडणूक २ डिसेंबर रोजी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट यांच्यात आघाडीबाबत चर्चा सुरू असली, तरी ठोस तोडगा निघू शकला नाही. आघाडीतील काही पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुय्यम नजरेने पाहत निर्णय प्रक्रियेत दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उसळली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसने वणीकरांना “सचोटीने काम करणाऱ्या आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना संधी द्या” असे आवाहन करत, लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे संकेत दिले. वणीतील राजकीय समीकरणांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार असून निवडणुकीची लढत आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();