सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव–वणी राज्य महामार्गावर तुळशीराम बारसमोर शनिवारी रात्री सुमारे साडेआठ वाजताच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवी घटनेने मारेगाव तालुका हादरला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये गौरव बापूराव आत्राम (23) रा. गौराळा आणि नमेश्वरी राजेंद्र हनुमंते (17) रा. बोपापूर (कायर), ह.मु. मारेगाव यांचा समावेश असून हे दोघेही स्कूटीने वणीवरून मारेगावकडे येत होते.
दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव आयसर ट्रकने स्कूटीला जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की स्कूटी ट्रकच्या चाकांमध्ये अडकून काही मीटरपर्यंत ओढली गेली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालकाने तत्काळ वाहन थांबवून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्घटनेतील दोन्ही मृत विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली असून अचानक घडलेल्या या हृदयद्रावक अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.