टॉप बातम्या

वणीत नगरपरिषद निवडणुकीत येणार ‘हाडाच्या’ कार्यकर्त्यांना नवी झळाळी!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आगामी नगरपरिषद निवडणुकीचे दिवस जसं जसे जवळ येऊ लागले तसं तसें हृदयाचे ठोके वाढू लागले असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत “हाडाच्या” कार्यकर्त्यांची नवी झळाळी दिसणार असून अनेक अनुभवी कार्यकर्त्यांनी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. दीर्घकाळापासून जनतेशी नाळ जोडून काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळे शहरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगत आहे. 

दुसरीकडे, काही प्रभागांत “लाडाच्या” उमेदवारीमुळे पक्षांचे पारंपरिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. काही पक्षांत अंतर्गत नाराजी वाढत असून निवडणूक तिकीटांच्या वाटपावरून असंतोष उफाळल्याची माहिती मिळत आहे. ही नाराजी अपक्ष उमेदवारांच्या रूपाने बाहेर पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोमात आहे.

वणी नगरपरिषदेत एकूण १४ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात पक्ष आणि विरोधक या दोघांचेही उमेदवार तगडे असले तरी या वेळी अपक्ष उमेदवारांचे चित्र अधिक असणार असे एकिवात आहे. अनेक गणांमध्ये अपक्षांची वाढती ताकद पाहता पक्षीय उमेदवारांना अक्षरशः घाम फुटणार यात शंका नाही. काही प्रभागांमध्ये तर अपक्ष उमेदवार थेट सरळ लढत देत असल्याने बहुकोनी संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

उमेदवारीचा गुलदस्ता अजूनही अनेकांकडे घट्टच असून अधिकृत घोषणा झाल्यानंतर शहरातील राजकीय हवामान आणखी तापणार हे निश्चित. हाडाच्या कार्यकर्त्यांची झळाळी, लाडाच्या उमेदवारीने बिघडणार गणित आणि अपक्षांची वाढती ताकद,या तिहेरी समीकरणामुळे यंदाची वणी नगरपरिषद निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();