सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (VBA) वणी शहरात ताकदीने उतरायला सज्ज झाली आहे. वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागांत सक्षम उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या वेळी वंचितचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी सांगितले की, “भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहोत.” मात्र, त्यांनी स्पष्ट केले की काँग्रेस किंवा इतर पक्षांसोबत अद्याप कोणतेही अधिकृत बोलणे झालेले नाही.
युतीच्या शक्यतेबाबत निमसटकर म्हणाले की, “जर सन्मानजनक जागा वाटप होत असेल, तर महाविकास आघाडी, समविचारी पक्ष आणि सामाजिक संघटनांसोबत चर्चा करण्याचे दार खुले राहतील.” वणीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी सांगितले की नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्ष स्वतंत्रपणे ताकद दाखवेल, मात्र योग्य समझोता झाला तरच युतीचा विचार केला जाईल.
पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, तसेच मंगल तेलंग, वैशाली गायकवाड, डॉ. प्रशिक बरडे, आशिष पाझारे, ऍड. चंदू भगत, अर्चना नगराळे, डॉ. आनंद वेले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वणीतील या घोषणेमुळे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी नव्या समीकरणांसह राजकीय लढतीचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.