सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : वणी शहर आणि परिसरातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. येत्या ६ नोव्हेंबर रोजी शिंदे सेनेचा वणीत भव्य पक्षप्रवेश सोहळा व जनता दरबार पार पडणार असून, यात दिग्गज नेत्या सह हजारो कार्यकर्ते धनुष्यबाणाचे प्रतीक असलेल्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. या सोहळ्यामुळे वणी तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, शहरातील गल्लीबोळात या सोहळ्याची चर्चा रंगली आहे. अनेक स्थानिक स्तरावर प्रभावी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपले पुढील राजकीय भवितव्य शिंदे सेनेत पाहत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या प्रवेशामुळे वणी तालुक्यात शिंदे सेनेची ताकद अधिक दृढ होणार आहे.
राज्यातील सत्तारूढ पक्षाच्या बळावर वणीमध्येही शिंदे सेनेची “ग्रँड ओपनिंग” होणार असून, यानंतर होणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये हा प्रवेश निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक विरोधकांची झोप उडवणारा हा पक्षप्रवेश सोहळा वणीच्या राजकीय इतिहासातील एक लक्षवेधी क्षण ठरणार आहे, यात शंका नाही.
हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम वणीतील आगामी राजकीय लढतींच्या दिशेने नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे.