सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी शहरातील एका ज्येष्ठ पत्रकारावर एका अवैध व्यावसायिकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास घडली. विशेष म्हणजे ही घटना पोलिसांच्या उपस्थितीतच भाजी मंडई जवळील नागिना मस्जिदसमोर घडली. या प्रकरणी वणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारीनुसार, फारुख हारून चिनी हे दुपारी दुकानाकडे जात असताना नागिना मस्जिदसमोर पोलिसांच्या गाड्या उभ्या दिसल्याने त्यांनी चौकशीसाठी थांबले. त्या वेळी अब्दुल हफीज अब्दुल सत्तार (वय ४०, रा. मोमीनपुरा) या व्यक्तीने त्यांच्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने फारुख यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले आणि त्यांना मारहाण केली. या झटापटीत फारुख यांचा चष्मा फुटला.
दरम्यान, फारुख चिनी यांची यावर्षी जानेवारी महिन्यात हैद्राबाद येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे झालेल्या मारहाणीमुळे त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समजते.
वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी आरोपी अब्दुल हफीज याच्याविरुद्ध कलम 296, 351(2), 351(3), 324(4), 324(5), 115 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.