सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : रस्त्यावरील अडथळा दूर करून शेतीमाल वाहतुकीस मार्ग उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी देवाळा येथील दोन शेतकऱ्यांनी आज दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. बापूजी अमृत देवाळकर (वय ५५) आणि संजय अमृत देवाळकर (वय ४८, दोघेही रा. देवाळा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदन दिले असतानाही कोणतीही कार्यवाही न झाल्याने हा निर्णय घेतला.
सदर शेतकऱ्यांनी दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात अर्ज दाखल करून रस्त्यावरील अडथळा दूर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा एकदा निवेदन देत दि. १० नोव्हेंबर रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. मात्र ठरलेल्या मुदतीत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज दुपारी १ वाजता प्रत्यक्ष उपोषणाला प्रारंभ करण्यात आला.याला वंचित बहुजन आघाडी, मारेगाव चा पाठिंबा आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, अडथळ्यामुळे त्यांच्या शेतीमालाची वाहतूक थांबली असून मळणीसाठी आलेल्या उत्पादनाचे नुकसान होत आहे. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून रस्त्याचा अडथळा दूर न झाल्यास त्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
या निवेदनावर विश्वास महादेव निखाडे, राहुल धर्मदास हस्ते, केशव कवड्जी खोके, प्रमोद गांजरे, आमिष गानफाडे, आषीश निखाडे, नितीन गांजरे, अशोक सावरकर, लहूदास बोकडे, दिलीप पिंपळशेडे, संजय निमकर, शंकर गानफाडे, किशोर तूरारे, सुरेश पुसाठे, संतोश निखाडे आणि मधुकर ठमके या यांच्याही सह्या आहे.
स्थानिक प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन अडथळा दूर करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने पुढील पावले काय उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.