टॉप बातम्या

अधिकाराचा वापर करून आपण लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे ॲड असीम सरोदे यांचे रोखठोक प्रतिपादन

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
    
वणी : प्रशासकीय कर्तव्याचे पालन करताना विवेकशीरता असली तर कायद्याचे पालन होते.म्हणूनच संविधानातील कर्तव्यांची जाणीव आणि विवेशीरता ही समाजात रूजली पाहीजे. सत्ताधाऱ्यांवर टीकात्मक विश्लेषण करण्याचा आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा अधिकार आणि आत्मविश्वास हा सामान्य नागरिकांना संविधानाने दिला आहे.त्या अधिकाराचा वापर करून आपण लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे.असे रोखठोक प्रतिपादन संविधान विश्लेषक ॲड असीम सरोदे यांनी केले. शिव महोत्सव समिती वणीच्या वतीने दिनांक 11 ऑक्टोबर रोज शनिवारला बाजोरीया लॉन येथे सायंकाळी संपन्न झालेल्या पहिल्या दिवसाच्या " संविधानातील कर्तव्यांची जाणीव आणि विवेकशीरता " या विषयावर बोलताना त्यांनी वरील भाष्य केले.रामचंद्र जागोजी सपाट समर्पित स्मृतीपुष्प कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अनंत मांडवकर होते.
    
माणसाचे सार्वजनिक वर्तन निश्चित करण्यासाठी नियम आणि कायद्यांची निर्मिती झाली.भारतीय संविधान हे बदल्याच्या भावनेतून नव्हे तर सर्व नागरिकांना उपकारक ठरेल या पद्धतीने रचल्या गेले.सध्या संविधानाची जाणीव निर्माण न करता पाठांतर करण्याचे संस्कार चालले आहे. त्यामुळे महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक झेप न पेलवणारा देश अशी आपली ओळख बनली आहे. प्रेरणा पुस्तकांमध्ये नाही तर पुतळ्यांमध्ये,अशी समज वाढत चालली आहे.प्रतिष्ठित विद्यापीठात शिकलेल्यांना "मोनी बाबा "आणि ज्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही ते "विश्वगुरू" असा प्रचार सुरू आहे. लोकांना संघटित करण्याचे काम शिवाजी महाराजांनी, महात्मा गांधींनी,डॉ आंबेडकरांनी उदात्त हेतुने केले. त्यांची लढाई अन्याय,अत्याचार आणि विषमतेविरुद्ध होती.
       
देशभक्तीची बदललेली संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की भारतावर प्रेम करणे म्हणजे पाकिस्तानला शिव्या देणे किंवा मुस्लिमांना व्देष करणे.असा सिद्धांत बनला आहे.मग आपण देशावर प्रेम करतो म्हणजे नक्की काय करतो ? असा सवाल त्यांनी केला.संविधानामुळे सामान्य नागरिक ताकतवर आहे.ही आपल्याला जाणीव असायला हवी.महाराष्ट्रात पारित झालेला जन सुरक्षा कायदा हा सत्ताधाऱ्यांच्या मानसिक भीतीचे प्रतिक असे त्यांनी स्पष्ट केले.कायदे हे लोकांसाठी आहे.त्यामुळे राज्यकर्त्यांनी लोकांच्या हिताचेच कायदे बनवले पाहिजे. सध्या देशभक्ती विरुद्ध अतिशयोक्ति पूर्ण राष्ट्रवाद असा संघर्ष आहे.
     
सध्याच्या अशा वातावरणात आपल्याला तात्विक व तार्किक पद्धतीने बोलतील अशा राजकीय नेत्यांची निवड करावी लागेल. प्रशासनाची बांधिलकी ही संविधानाशी आहे, कुठल्या राजकीय पक्ष आणि नेत्यांशी नाही.हे आपल्याला ठासून सांगता आलं पाहिजे.वाढलेल्या धर्मांधतेवर बोलतांना त्यांनी देव आणि धर्म घरातच ठेवला पाहीजे.घराच्या बाहेर आपण सर्व भारतीय नागरिक आहोत.ही जाणीव सतत बाळगायला हवी.संविधानाचे महत्व स्पष्ट करतांना त्यांनी संविधान हे चांगुलपणाचे बास्केट आहे.असे गौरवउदगार काढले.
     
व्याख्यानाचा समारोप करताना त्यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारक,भावनिक राजकारण,पर्यावरण,भांडवलशाही ईत्यादी विषयांवर सोदाहरण भाष्य केले.सामान्य माणसांच्या लढाई करता वैचारिक दारिद्र्यपण कमी झालं पाहिजे.सध्या लोकशाही मान्य नसलेले हुकूमशहा सत्तेवर आहेत.त्यामुळे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.ते आपण सतत बजावत राहावे. असे सुचित केले.व्याख्यान कार्यक्रमात अतिथी म्हणुन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, न.प. मुख्याधिकारी सचिन गाडे,मराठा सेवा संघाचे अंबादास वागदरकर,डॉ.सुनिल जुमनाके,पत्रकार नितीन पखाले, एड परवेज पठाण,वंदना विधाते -धांडे,भारती राजपुत, गजानन चंदावार उपस्थित होते.बळीराजा अभिवादन आणि जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक मनोगत विलास शेरकी,सुत्रसंचालन कृष्णदेव विधाते तर आभार अजय धोबे यांनी मानले.यशस्वितेकरिता सुरेंद्र घागे, वसंत थेटे,राजेश्वर कुचनकार,मारोती जिवतोडे,संदीप ठाकरे,विजय दोडके आदींनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();