सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : वणी–नांदेपेरा–मार्डी हा राज्य मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून या मार्गावर अनेक ठिकाणी वळणे (टर्निंग) असल्याने वाहनचालकांना विशेष काळजी घ्यावी लागते. तथापि, नांदेपेरा ते वनोजा देवी चौफुली या दरम्यानच्या डेंजर झोन वळणावर रस्त्यालगत चार ते पाच फूट उंचीपर्यंत वाढलेली झुडुपे अपघातांना आमंत्रण देत आहेत.
रस्त्याच्या अगदी कडेला वाढलेली ही झाडाझुडुपे समोरून येणारी वाहने दिसू देत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना समोरचा अंदाज न आल्याने धोक्याची स्थिती निर्माण होते. या मार्गावर दररोज अनेक जड वाहने, दुचाकी तसेच प्रवासी बसची ये-जा होत असते. शिवाय रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि निकृष्ट दर्जाची दुरुस्ती यामुळे प्रवास अधिकच धोकादायक बनला आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवाश्यांचे म्हणणे आहे की, “या मार्गावर एकेकाळी मयकुली कर्मचारी नियमितपणे रस्त्याची स्वच्छता आणि झाडाझुडुपे छाटण्याचे काम करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांचा पत्ता नाही. रस्त्यांची दुरवस्था वाढत असून विभागाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसते.”
सध्या या मार्गावरून वाहतूक करताना चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. वाढलेल्या झाडाझुडुपांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झुडुपे साफ करावीत, अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे.