सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
झरी-जामणी : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने महापूरासारखा कहर निर्माण केला आहे. सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत. गुरुवार (दि. ११ सप्टेंबर) ला तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावताच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खरडून गेली.
पावसाचा तडाखा एवढा मोठा होता की कापूस, सोयाबीन, उडीद यांसारख्या हंगामी पिकांची वाढ खुंटली असून मोठ्या प्रमाणावर पिकांची हानी झाली आहे. शेतकरी आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना ही नैसर्गिक आपत्ती त्याच्यासाठी आणखी संकट ठरली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधत झरी-जामनी तालुका तातडीने अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच, नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत, आर्थिक भरपाई आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की केवळ कागदोपत्री पंचनाम्यांवर थांबून चालणार नाही, तर प्रत्यक्षात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दुःखद परिस्थितीची पाहणी करावी. शेतकऱ्यांचे जीवन वाचवण्यासाठी त्वरित मदतीची गरज असल्याचे ते सांगत आहेत.
झरी-जामनी तालुक्यातील शेतकरी समुदाय आज अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे शासनाने ठोस पावले उचलून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.