सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काँग्रेसची सोमवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी वसंत जिनिंग हॉल, वणी येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीवर सखोल चर्चा झाली. चर्चेअंती भविष्यात जोमाने आणि एकजुटीने निवडणूक लढण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. बैठकीला पक्षातील वणी विधानसभेतील ज्येष्ठ नेते, विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खा. प्रतिभा धानोरकर यांच्या आदेशाने व काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात ही बैठक पार पडली. नरेंद्र ठाकरे उपाध्यक्ष जि प यवतमाळ हे बैठकीचे अध्यक्ष होते. बैठकीत निवडणूक रणनीती, जनसंपर्क आणि स्थानिक समस्यांवरील उपाययोजना यावर चर्चा झाली. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी ठोस योजना आखण्यात आल्या. पक्षात युवा कार्यकर्त्यांचा सहभाग आणि ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद वाढवण्यावर भर देण्यात आला.
"समन्वयाने काम केल्यास काँग्रेसचा झेंडा फडकणार"कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून मतदारांचा विश्वास संपादन करावा. राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत असून ते शेतकरी, मजूर आणि युवकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या याच धडाडी आणि समर्पणाच्या मार्गावर पक्षाने चालायला हवे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळे पक्षाला नवीन उर्जा मिळाली आहे. सर्वांनी समन्वयाने काम केल्यास जिल्हा परिषद, नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार – संजय खाडे, प्रदेश सचिव काँग्रेस
नरेंद्र ठाकरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला. पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, शंकरराव व-हाटे, तेजराज बोढे, वसंतराव आसुटकर, विकेश पानघाटे, सुरेश रायपुरे, ओम ठाकूर, सुनील वरारकर, प्रमोद लोणारे, राकेश खुराणा, पुंडलिक गुंजेकार, प्रेमनाथ मंगाम, प्रफुल्ल उपरे, अशोक चिकटे, प्रभाकर मधुकर मुळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करीत पक्ष संघटना वाढीबाबत मत मांडले.
बैठकीत आगामी काळात गावोगावी जनसंपर्क मोहिम राबवणे, मतदारांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणे. तसेच, युवा आणि महिला सेल्सना विशेष जबाबदारी देण्याबाबत चर्चा झाली. कार्यक्रमाचे संचालन अनंत डुंभारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजू अंकीतवार यांनी मानले. या बैठकीमुळे वणीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे.