सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : सहकार क्षेत्रात भक्कम पायाभरणी करून तळागाळापर्यंत पोहोचलेल्या रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा सभासद मेळावा (ता. 27) मारेगाव येथे पार पडला.
या प्रसंगी अध्यक्ष अॅड. देविदास काळे बोलताना म्हणाले की, “गुंतवणूकदार, कर्जदार व अभिकर्त्यांच्या दृढ विश्वासामुळेच आज संस्थेचा वटवृक्ष इतका विस्तारला आहे. हा विश्वास कायम ठेवत संपूर्ण महाराष्ट्रात संस्था बहरावी, हा आमचा संकल्प आहे.”
मेळाव्याचे उद्घाटन सहा. निबंधक सचिन कुडमेथे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संजय देरकर, सहा. निबंधक सुरेश इंगोले, माजी जि.प. सभापती अरुणाताई खंडाळकर, बाजार समितीचे वसंतराव आसुटकर यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यातून गेल्या ३५ वर्षांची वाटचाल, कार्याचा लेखाजोखा व आगामी दिशा यावर प्रकाश टाकण्यात आला. वीज पडून नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना संस्थेच्या वतीने मदत जाहीर करण्यात आली. तसेच ठेवीदार, नियमित कर्जदार, व्यवस्थापक व अभिकर्त्यांचा गौरवही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या भाषणात आमदार देरकर यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना, “विश्वास, प्रामाणिकपणा आणि सहकार्य यांच्या जोरावर संस्था सहकार चळवळीत वेगळा ठसा उमटवत आहे” असे नमूद केले.तसेच सुरेश इंगोले, सचिन कुडमेथे, अरुणाताई खंडाळकर, अरविंद ठाकरे व उदय रायपुरे यांनीही संस्थेच्या विश्वासार्हतेवर आपले विचार मांडले.
मेळाव्याचे प्रास्ताविक सुरेश बरडे यांनी केले, सूत्रसंचालन अशोक कोरडे यांनी तर आभार प्रदर्शन विलास होलगीरवार यांनी केले.