सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
भंडारा : जिल्हा व तालुक्यातील आदिवासी संघटनांनी येत्या ९ ऑगस्टला “जागतिक आदिवासी दिनानिमित्त” विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यानुषंगाने अंगणवाडी मदतनीस पदभरती घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवून त्यावर विजय मिळवणारी शंकरपुर येथील २४ वर्षीय आदिवासी तरुणी शेजल सयामला सत्कारासाठी आमंत्रित केलेले आहे.
शेजल सयामचा जन्म शंकरपुर (ता. साकोली) येथील एका गरीब आदिवासी सयाम कुटुंबात झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला मामाच्या गावी म्हणजेच शिरेगांव/बांध येथे शिक्षण घेण्यास पाठविले. तिथे तिने पूर्व प्राथमिक शिक्षण ते उच्च माध्यमिक शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
शेजलचे माध्यमिक शिक्षण सुरू असतांना, तिचे वडील भारत सयाम यांचे आकस्मित निधन झाले व कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला ! मात्र, आई उषा सयाम यांनी परिस्थिती सावरत आपल्या लेकरांचा सांभाळ केला व त्यांना पुढील शिक्षण शिकविण्याचे ठरविले, मात्र; वडील वारल्यानंतर घराची जबाबदारी पुत्र वैभव सयामच्या खांद्यावर आल्याने त्याने माध्यमिक शिक्षण अर्धवटचं सोडलं; परंतु शेजलला उच्च शिक्षण शिकवण्याचा दृढ़ निश्चय कुटुंबियांनी केला.
बैचलर ऑफ आर्टचे शिक्षण घेण्यासाठी शेजलने मनोहरभाई पटेल कॉलेज साकोली येथे प्रवेश घेतला व दरम्यानच्या काळात तिच्या खऱ्या गुणांची ओळख झाली. शंकरपुर येथे अवैध पद्धतीने अंगणवाडी केंद्रात राबविण्यात आलेल्या मदतनीस पदभरतीचा तिने स्पष्ट विरोध केला. या अन्यायविरोधात ती तब्बल पाच महिने लढत राहिली. शेवटी २४ जुलै ला तिच्याकडून निकाल लागला व शेजलचा विजय झाला.
शेजलची जिद्द, चिकाटी व मेहनत पाहून अख्खं जिल्हा तिचा चाहता झाला आहे व जिल्ह्यात सर्वत्रचं तिच्या नावाच्या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त भंडारा जिल्हा व साकोली तालुका येथील आदिवासी संघटनांनी तिचा भव्य सत्कार करण्यासाठी तिला आमंत्रित केलेले आहे. करिता सर्व जिल्हा व तालुक्यातील जनतेचे लक्ष शेजल सयाम कडे वेधलेले आहे.