सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शेतकऱ्यांचा आवडता बैलपोळा सण आज आहे. शेतकऱ्यांसाठी बैलपोळ्याचे खूप महत्त्व आहे. बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत काल गुरुवार रोजी बैलांची खदि शेकणी करून आज आवतण घ्या, उद्या जेवायला या, अशी साद घालून बळीराजा आपल्या सर्जाराजाला आमंत्रण दिले आहेत. सर्जाराजाच्या आनंदासाठी शेतकऱ्यांमध्ये पोळ्याचा उत्साह आहे.
वर्षभर शेती अन् मालकासाठी राबराब राबल्यानंतर सर्जाराजाला बैल पोळ्याच्या निमित्ताने आराम मिळतो. नुसता आरामच नाही, तर त्याची चांगली बडदास्तही ठेवली जाते. त्याला सजवून, त्याची पूजा करून, गोडधोड खायला घालून त्याच्याप्रती ऋण व्यक्त केले जाते. पोळ्याच्या पूर्वसंध्येला त्यांची खांदे शेकणी करण्यात येते. या वेळी कच्चे तूप आणि हळदीचे मिश्रण करून बैलाच्या खांद्याला लावले जाते. शिंगाला देखील तेल लावले जाते. त्याला दुसऱ्या दिवशीच्या पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जाराजाची पोळा सणानिमित्त आदल्या दिवशी शेतकरी राजा सायंकाळी खांदे शेकणी करून त्याला नैवद्य देतात. बळीराजा पोळ्याला आणि पोळाच्या आधल्या दिवशी बैलांना कामाला जुंपत नाही. सकाळी बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. सायंकाळी पळसाच्या पानाने तुप, हळद लावून बैलांचे खांदी शेकले जातात. त्यानंतर घरधनीन बैलांची पूजा करून त्यांना पोळ्यानिमित्त पुरणपोळी जेवणाचे आमंत्रण देतात. यांत्रिकीकरणातही सर्जाराजाविषयी प्रेम सर्जाराजा सजवण्यात ठेवणार नाही कसर सततचा दुष्काळ आणि या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा करण्यासाठी तयारी केली आहे.
महागाईचा फटका या सणालाही बसला आहे. बैलांना सजविण्यासाठी झूल, मोरकीसह सर्वच वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. मात्र, तरीही बळीराजाने आपल्या सर्जाराजांना सजविण्यासाठी कुठलीही कसर ठेवली नाही. कितीही अडचण आली तरी आम्ही पोळा सण साजरा करतो, अशा प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात. पूर्वीच्या काळात गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे बैलजोडी असे. गेल्या दहा-पंधरा वर्षाच्या काळात गोधन मोठ्या प्रमाणात नामशेष होत चालले. यांत्रिकीकरणाचा हा परिणाम असून कृषी संस्कृतीच्या मुळावर उठला आहेच, घाव घातल्या जात आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे सहज होत असली, तरी मुक्या जीवांविषयीची शेतकऱ्याचे प्रेम कमी होताना दिसत नाही.