सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगांव तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये अकार्यक्षम, कामात हलगर्जीपणा, जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व कार्यालयामध्ये वेळेत गैरहजर राहणाऱ्या आणि मुख्यालयी हजर न राहणाऱ्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यावर कारवाई करावी,अशा आशयचे निवेदन आज (ता. 23) ला प्रभारी तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले.
समस्यांचे बाजारगाव असलेल्या व कायम शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका म्हणुन नावारुपास आलेल्या मारेगांव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सावळा गोंधळ सर्वश्रुत असुन कार्यालयीन वेळेत कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या अकार्यक्षम, कामात हलगर्जीपणा, जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व मुख्यालयी हजर न राहणाऱ्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचा बोलबाला असल्याचा निवेदनकर्त्यांचा आरोप आहे.
पुढे असेही नमूद आहे की,कार्यालयात बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. कार्यालयात कृषी सहाय्यक मंडळ मुख्य कृषी पर्यवेक्षक आणि कनिष्ठ लिपीकांचा अनागोंदी अफलातुन कारभाराला ऊत आलेला आहे. तालुका कृषी कार्यालयात संगनमताने मोगलाई बळकट करुन खाबुगिरीचा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे.
मारेगांव तालुक्यातील शेतकरीत खरीपाच्या लगबगीत असुन शेतकऱ्यांना दुबार -तिबार पेरणीला समोरे जावे लागले असुन शेतकऱ्यांच्या शेती समस्या जाणुन त्यांना पिक परीस्थीतीनुसार खरीपपुर्व मार्गदर्शनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. सोयाबिन, कापुस, तुर लागवड सुरक्षीत किटकनाशकाचा वापर, तणनाशके, सुरक्षीत फवारणी इत्यादीबाबत मार्गदर्शनासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असुन, कार्यालयीन कर्मचारी वेळेत हजर राहत नसल्याने व मुख्यालयी हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागतेआहे. त्यामुळे संबंधितावर उचित कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी श्री. एस जे बुटले प्रभारी तालुका कृषी अधिकारी, मारेगाव यांना निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर शेतकरी विलास रायपुरे,गजानन चंदनखेडे ह्यांच्या सह्या आहे.