Top News

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ वणीत तिरंगा रॅली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरांमध्ये दि. 22 मे रोजी "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. हातामध्ये तिरंगा झेंडा घेत घोषणा देत वणीकर नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

पहेलगाम येथे भारतीय पर्यटकांवर धर्म विचारत हल्ला करत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या. महिलांच्या समोर त्यांच्या पतींना निर्दयीपणाने गोळ्या मारण्यात आल्या होत्या. याचा बदला घेण्यासाठी भारत सरकार व भारतीय सैन्य दलाच्या वतीने मिशन सिंदूर हे अभियान राबवत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार हल्ला करण्यात आला होता. भारताने घेतलेल्या या रोखठोक भूमिकेमुळे पाकिस्तानला अखेर नमते घेऊन माफीनामा द्यावा लागला. भारतीय सैनिकांनी केलेल्या या शौर्याबद्दल व त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र मिशन सिंदूर अंतर्गत तिरंगा रॅली आयोजित केली जात आहे. वणी शहरात देखील माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकारातून काल गुरुवारी रोजी सायंकाळी या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात हजारो नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. महिलांची संख्या उल्लेखनीय होती.
याप्रसंगी कॅप्टन महादेव गाताडे, किरण बुजोने, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ऑपरेशन सिन्दुर मधील वीर सैनिकांच्या शौर्याचा व पराक्रमाची माहिती उपस्थितांना देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून भारतीय सैन्याच्या पाठीशी संपूर्ण देश ठामपणे उभा असल्याचा उद्घोष केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी राष्ट्रगीताने या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला. त्या ठिकाणी काही माजी सैनिक व वीरपत्नी यांचा देखील शाब्दिक सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post