सह्याद्री चौफेर | वृतसंस्था
वणी : विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेवून चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा विकास केल्यास करिअर बनवणे सहज शक्य आहे. प्रत्येकात प्रचंड क्षमता आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वतःच्या मनात डोकावून उपजत क्षमता, कौशल्ये विकसित व अद्यावत केल्यास करिअरच्या संधी चालून येतील असा सल्ला उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी दिला. ते लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लायन्स क्लब चे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव किशन चौधरी, प्रोजेक्ट डायरेक्टर पुरुषोत्तम खोब्रागडे, महेन्द्र श्रीवास्तव, चंद्रकांत जोबनपुत्रा, अकॅडमीक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे मंचावर उपस्थित होते.
मोबाईल फोनच्या अतिरेकी वापरामुळे वाचन व विचारशक्ती कमी झाली असून "मोबाईल आपल्यासाठी की, आपण मोबाईलसाठी" याचा विचार करण्याची गरज आहे. हे स्पष्ट करुन मुलींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पाहुण्यांचा परिचय श्री राम पवार यांनी केला. कार्यशाळेचे प्रास्ताविक राजाभाऊ पाथ्रडकर, सूत्रसंचालन किरण बुजोणे तर आभार किशन चौधरी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये - एसडीपीओ गणेश किंद्रे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 21, 2024
Rating: