सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : जल, जंगल व जमीन संदर्भातले आदिवासींचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत हे सर्वश्रुत असताना राज्याचे मुख्यमंत्री खऱ्या आदिवासीना न्याय न देता गैर आदिवासीना न्याय देण्याची भाषा करत असल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. त्याचेच पडसाद वणी येथेही पाहायला मिळाले. आज वणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध करण्यात आला व एका निवेदनाद्वारे राज्यपाल यांना धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करू नये किंबहुना आदिवासीचे आरक्षण त्यांना लागू करू नये, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना केली. विशेष म्हणजे,मागील महिन्यात वणी येथील शेतकरी मंदिरात आदिवासी सामाजिक न्याय संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या संसदेत आमदार, खासदार व वन मंत्र्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात आले होते. परंतु या मान्यवरांनी आदिवासिंच्या या न्याय संसदेला पाठ फिरवली. त्यामुळे आदिवासीनी चिंतन करून आता पुढे काय केल पाहिजेत यासाठी तातडीची बैठक बोलावून वणी विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त आदिवासी संघटनांना एकत्र करून आमदार, खासदार, मंत्र्यांचा निषेध व धरणे आंदोलन करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता.
लोकप्रतिनिधीच्या अनुपस्थितीने समाजात तीव्र संतापाची लाट पसरली असल्यामुळे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यातील नेते आदिवासीच्या मतांवर राजकारण करणारे आदिवासिंच्याच न्याय हक्कासाठी जाणूनबुजून पाठ फिरवतात, हे आता आदिवासी समाजाने पक्क ओळखून घेतले आहे. त्यामुळे आज शुक्रवारी (ता. 11) ला वणी येथील तहसील कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन व मुख्यमंत्री यांच्या चुकीच्या निर्णयाचा जाहिर निषेध केला. या धरणे आंदोलनात झरी, मारेगाव व वणी तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
अगदी तोंडावर असलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत आदिवासी समाज हा राजकीय व्यवस्था बदलण्याकरिता संग्रामात उतरला असून तो येत्या निवडणुकीत संविधान विरोधी, आरक्षणविरोधी, प्रस्थापित पक्षांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा तीव्र भावना आदिवासी समाजातील अनेकांनी यावेळी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.
निवेदन देताना वणी विधानसभा क्षेत्रातील विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पुरुष उपस्थित होते.
आदिवासी समन्वय समितीतर्फे वणीत धरणे आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 11, 2024
Rating: